वार्धक्यातही त्यांनी जपलाय चित्रकलेचा छंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:23+5:302021-07-20T04:26:23+5:30
सातारा : माणूस वार्धक्याकडे झुकू लागला की त्याला त्याच्या अंगभूत कलांचा देखील हळूहळू विसर पडू लागतो. मात्र, कोरेगाव येथे ...

वार्धक्यातही त्यांनी जपलाय चित्रकलेचा छंद !
सातारा : माणूस वार्धक्याकडे झुकू लागला की त्याला त्याच्या अंगभूत कलांचा देखील हळूहळू विसर पडू लागतो. मात्र, कोरेगाव येथे राहणारे शिवराम दयाळ याला अपवाद ठरू पाहत आहेत. वय वर्ष ८८ असूनही दयाळ यांनी चित्रकलेचा छंद लीलया जोपासला आहे. एखाद्या नव कलाकाराला लाजवेल असे बारकावे ते आपल्या चित्राच्या माध्यमातून टिपत असतात. इतकेच नव्हे तर हार्मोनियमवरील त्यांची पकड आजही पूर्वीइतकीच मजबूत आहे.
कोरेगाव येथे राहणाऱ्या शिवराम दयाळ यांचा जन्म १९३३ रोजी झाला. आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी साताऱ्यातील कुपर कारखान्यात सुमारे ३२ वर्षे सेवा केली. शालेय जीवनातच त्यांना चित्रकलेचा छंद जडला होता. त्यामुळे कल्पनाशक्तीने त्यांनी शेकडो चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. १९५२ रोजी शिवराम दयाळ यांनी अनेक शास्त्रज्ञांची पेन्सिलच्या साहाय्याने चित्रे काढली. त्याकाळी रंगाचा उपयोग केला जात नव्हता. तेव्हा बहुतांश चित्र कृष्णधवल असायची. द्राक्षांची वेल जाळल्यानंतर त्यापासून जी पावडर तयार व्हायची ती काळ्या रंगाची असायची. ही पावडर चित्र रंगवण्यासाठी वापरली जायची. या पावडरच्या साह्याने काढलेले चित्र आजही पूर्वीइतकेच जिवंत वाटते. वार्धक्यात हात थरथरायला लागतो. मात्र, शिवराम दयाळ यांनी जी चित्रे काढली, त्यांच्यात जे बारकावे टिपले ते पाहून भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.
दयाळ यांनी नुकतीच वयाची ८८ वर्षे पूर्ण करून ८९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांनी चित्रकलेबरोबरच हार्मोनियम वाजविण्याची कलाही लहानपणीच आत्मसात केली. त्यांनी सुप्रसिद्ध गायक पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिशेकी यांना हार्मोनियमवर साथ दिली आहे. दयाळ यांना कोरेगाव येथील छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. शिवराम दयाळ यांचा मुलगा व नातवंडांनी देखील चित्रकला व हार्मोनियमची आवड जोपासली आहे.
(चौकट)
औंधच्या संग्रहालयात शास्त्रज्ञांची चित्रे
शिवराम दयाळ यांनी गॅलिलिओ, न्यूटन यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस, प्रफुल्लचंद्र रॉय, सी. व्ही. रामन यांचीदेखील चित्रे रेखाटली आहेत. आज या चित्रांना ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी काढलेली शास्त्रज्ञांची चित्रे औंध येथील संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. गेल्या ६०-७० वर्षांतील चित्रांचे प्रदर्शन भरवणार असल्याचा संकल्प शिवराम दयाळ यांचे सुपुत्र सुरेश दयाळ यांनी केला आहे.
फोटो मेल : शिवराम दयाळ
लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी