सत्ता संपत आली तरीही सत्ताधारी कळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST2021-02-27T04:51:44+5:302021-02-27T04:51:44+5:30

प्रमोद सुकरे कऱ्हाड : कऱ्हाड नगरपरिषदेची अर्थसंकल्पीय सभा गुरुवारी यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात झाली. या पंचवार्षिकमधील हा ...

Even after the end of power, the ruling party did not know! | सत्ता संपत आली तरीही सत्ताधारी कळेना!

सत्ता संपत आली तरीही सत्ताधारी कळेना!

प्रमोद सुकरे

कऱ्हाड : कऱ्हाड नगरपरिषदेची अर्थसंकल्पीय सभा गुरुवारी यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात झाली. या पंचवार्षिकमधील हा शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यावर विरोधी लोकशाही आघाडीने जनशक्तीकडे बघत हल्ला चढविला; पण त्याला उत्तर कोणी देईना अशी परिस्थिती झाली. तेव्हा ज्यांनी अर्थसंकल्प वाचला तेच उत्तर देतील अशी भूमिका जनशक्तीच्या नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे पालिकेची सत्ता संपत आली तरी सत्ताधारी कळेना अशी परिस्थिती पाहायला मिळाली.

थेट जनतेतून निवडून आलेल्या रोहिणी शिंदे या कऱ्हाडचे नगराध्यक्षपद भूषवित आहेत. त्या भाजपच्या माध्यमातून निवडून आल्या आहेत. पण, सभागृहात जनशक्ती आघाडीचे बहुमत आहे; त्याचे जयवंतराव पाटील उपनगराध्यक्ष आहेत, तर लोकशाही आघाडी विरोधी बाकावर आहे. भाजपचे तर मोजकेच नगरसेवक सभागृहात आहेत. त्यामुळे पालिकेचा कारभार हाकताना नगराध्यक्षा शिंदे यांना कसरत करावी लागत नसेल तर नवलच!

गुरुवारी झालेल्या विशेष सभेत बोलताना खुद्द नगराध्यक्षा शिंदे यांनी गत पाच वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे, वादळे, नैसर्गिक आपत्ती, अशा अनेक अनुभवातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या; यातूनच माझी राजकीय, सामाजिक जडणघडण होत गेली असे आवर्जून नमूद केले अन् हे अंदाजपत्रक शहरवासीयांच्या हिताचे असल्याचे सांगितले.

भाजपचे नगरसेवक सुहास जगताप यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. त्यानंतर विरोधी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी बजेट म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या कामाचा आरसा असतो. मात्र, हे बजेट तर कऱ्हाडकरांच्या डोळ्यात धूळ फेक करणारे असल्याचा आरोप केला. बजेटमध्ये कोणताच महत्त्वाकांक्षी प्रकल्प नाही; नको ती भाडेवाढ केली आहे. पण, ‘दात टोकरून पोट भरत नाही’ असे त्यांनी सुनावले. ते बोलत असताना जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांकडे बघून बोलत होते. त्यावर उत्तर मागत होते; पण सुरुवातीला कोणीच काही बोलेना. मग जनशक्तीच्या नगरसेवकांनी ज्यांनी बजेट वाचले तेच तुमच्या प्रश्नांना आता उत्तर देतील असे सांगितले अन् सभागृहात गदारोळास सुरुवात झाली.

नगरसेवक विजय वाटेगावकर म्हणाले, चार वर्षे जनशक्ती आघाडीचे नगरसेवक बजेटचे वाचन करीत होते. कारण सभागृहात आमचे बहुमत आहे. यंदा मात्र भाजपच्या नगरसेवकाने हे बजेट वाचले आहे. त्यामुळे पालिकेत सत्ताधारी नेमके कोण आहे हे अगोदर आम्हाला कळू द्या, असा पवित्रा घेत नगराध्यक्षांना जाब विचारला. भाजप नगरसेवकाने बजेट वाचले आहे. त्यावर प्रश्न उपस्थित होत असतील तर त्याची उत्तरे भाजप देईल अशी भूमिका मांडली. येत्या डिसेंबर महिन्यात पालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपणार आहे. सत्ता संपत आली तरी पालिकेत सत्ताधारी कोण हे नगरसेवकांना कळले नाही तर कऱ्हाडकरांना काय कळणार?

शेवटी बहुमतात असणाऱ्या जनशक्ती आघाडीने भाजपची सूचना फेटाळून लावून नव्या उपसूचना मांडत अर्थसंकल्प बहुमताने मंजूर केला. तरीही शेवटी नक्की सूचना की उपसूचना मंजूर यावरून सभागृहात बराच वेळ गदारोळ पाहायला मिळालाच.

चौकट :

उपनगराध्यक्ष गैरहजर ..

पालिका अर्थसंकल्पाच्या विशेष सभेला उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील गैरहजर होते. त्याची शहरभर चर्चा आहे. या आगोदरच्या मासिक सभेत उपनगराध्यक्ष जयवंतदादा उपस्थित असूनही सभागृहात एक शब्दही बोलले नाहीत. तेव्हा ते सभागृहात शांत का बसले होते याचं कोडं कोणाला सुटले नव्हते. पण, आता तर ते बजेटच्या सभेला नव्हते त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

Web Title: Even after the end of power, the ruling party did not know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.