रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ‘ताई’ गजाआड!

By Admin | Updated: August 28, 2015 22:45 IST2015-08-28T22:45:47+5:302015-08-28T22:45:47+5:30

‘दरबार’ बरखास्त : ‘अंनिस’च्या सातारा-सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने केला पर्दाफाश

On the eve of Rakshabandhan 'Tai' GazaAud! | रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ‘ताई’ गजाआड!

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ‘ताई’ गजाआड!

सातारा : कर्नाटकातील यल्लमा देवी, तुळजापूरची अंबाबाई, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि स्थानिक शिवेवरील देवी अशा चार देवींचा संचार होत असल्याचा दावा करणारी सुनीता रमेश वीटकर ऊर्फ ताईमहाराज अखेर एका मधुमेहग्रस्त भक्ताच्या तक्रारीमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडली. अपघातात गंभीर दुखापत झालेल्या या भक्ताला उपचारांपासून रोखून तिने सुमारे पाच ते सहा लाख रुपये खर्च करायला लावले.अडतीस वर्षांचे वसंत तात्याबा माने हे कोथळे (जि. सोलापूर) गावचे रहिवासी. अपघातात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. मधुमेह असल्याने उपचार दीर्घकाळ सुरू होते. त्याच वेळी त्यांना नातेपुते-दहिगाव रस्त्यावरील या ‘ताई’चा दरबार दिसला आणि सुरू झाला मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रासांचा फेरा.
ताईने माने यांना पाच महिने दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यास सक्त मनाई केली. ‘हा शरीरभोग नसून भाऊबंदकीतून केलेल्या करणीचा प्रताप आहे,’ हे त्यांच्या कुटुंबीयांवर बिंबविले. कुणीतरी त्यांच्यावर ‘घातलेल्या देवा’चा अंगारा म्हणून लाल रंगाचे मिश्रण रोज लिंबाबरोबर प्यायला लावले. हाच अंगारा जखमेवरही लावायला सांगितले. जखमा गंभीर असूनही तोच अंगारा पाण्यात टाकून, त्यात दूध, दही, झाडांची पाने टाकून त्या पाण्याने माने यांना अंघोळ घातली जात असे. नकार देताच ‘परिणाम वाईट होईल,’ अशी भावनिक धमकी दिली जात असे. अखेर माने यांनी तेथून पळ काढून दवाखान्यात धाव घेतली.ताईने माने यांना दहा ते पंधरा वेगवेगळ्या देवांच्या यात्रा करायला भाग पाडले. एका जत्रेचा खर्च सुमारे चाळीस हजार येत असे. या माध्यमातून पाच ते सहा लाखांची लूट तिने केली. याखेरीज तिची स्वत:ची दक्षिणा वेगळीच! समोरच्या व्यक्तीची पारख करून ती दक्षिणा ठरविते, असे माने यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ताई जवळजवळ रोज ‘दरबार’ भरवीत असे. विशेषत: मंगळवार शुक्रवार आणि रविवार महत्त्वाचे मानले जात. अमावस्या आणि पौर्णिमा हे विशेष गर्दीचे दिवस असत. (प्रतिनिधी)


हमखास तोडग्याचा फसवा दावा
कोणत्याही समस्येवर हमखास तोडगा देण्याचा दावा ताई करीत होती. यल्लम्मा देवीच्या फोटोसमोर अंगारा टाकून त्यावर ती नाणे उभे करीत असे आणि पुढील सूचना करीत असे. भूतबाधा, करणी, पितरे, चेटूक, गंभीर आजार घालविण्याचा दावा करीत असे. मूल होत नसल्यास ती ‘तोडगा’ देई. बायको सोडून गेली किंवा नवरा नांदवत नाही, अशा समस्यांचे निराकरण करण्याचा दावा करीत असे.
डॉक्टरांना अभिवादन
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची दोन वर्षांपूर्वी २० आॅगस्ट रोजी हत्या करण्यात आली होती. तो दिवस रक्षाबंधनाचा होता. २० आॅगस्टच्या पूर्वसंध्येला ‘अंनिस’ने दोन भोंदूबुवांचा पर्दाफाश केला होता. आता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाही ताईमहाराज या भोंदू महिलेचा भांडाफोड करून कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना अभिवादन केले आहे.

Web Title: On the eve of Rakshabandhan 'Tai' GazaAud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.