भोंदवडे व आंबवडे खुर्दमध्ये नावांमध्ये चुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:22+5:302021-01-08T06:05:22+5:30
परळी : भोंदवडे गावची आंबवडे खुर्द गावात व आंबवडे खुर्दची भोंदवडे गावात सुमारे १०० नावे चुकीची झाल्यामुळे दोन्ही ...

भोंदवडे व आंबवडे खुर्दमध्ये नावांमध्ये चुका
परळी : भोंदवडे गावची आंबवडे खुर्द गावात व आंबवडे खुर्दची भोंदवडे गावात सुमारे १०० नावे चुकीची झाल्यामुळे दोन्ही गावांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र यावर प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी येथून पुढे ग्रामपंचायत, लोकसभा, विधानसभा अशा कोणत्याच निवडणुकीवर मतदान करणार नसल्याचे सांगितले आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतींचे निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण सातारा जिल्ह्यात नवचैतन्य आल्यासारखे पाहायला मिळत होते. परंतु भोंदवडे व आंबवडे खुर्द येथील मतदार यादी नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले आहे.
सातारा जिह्यातील सर्वात जास्त अशा ग्रामपंचायती निवडणुकीचा धुरळा उडणार आहे; परंतु काही ठिकाणी नादुरुस्त यादी यामुळे मोठे प्रश्न उद्भवत आहेत. त्यामुळे भोंदवडे येथील जवळपास अडीचशे ते तीनशे मतदारांची नावे मौजे आंबवडे खुर्द (ता. सातारा) यादीत गेल्याने मोठा खोळंबा झाल्याचे ग्रामस्थ सांगत होते, तसेच आंबवडे खुर्द गावातील अंदाजे २५० लोकांची नावे मतदार यादीत सामाविष्ट नाहीत. तसेच भोंदवडे येथे २५० नावे चुकून आल्याने मोठी अडचण येत आहे. जोपर्यंत ही नावे दुरुस्त होऊन पुन्हा भोंदवडे-आंबवडे खुर्द या गावांच्या यादीत येत नाहीत, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमावर दोन्ही गावांनी बहिष्कार टाकला असल्याचे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले. तसेच याबाबत निवेदनही तहसीलदार यांना दिले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.