टीव्ही युगातली मुलं रमली निसर्गात..!

By Admin | Updated: May 24, 2016 00:52 IST2016-05-23T22:42:01+5:302016-05-24T00:52:26+5:30

चिंधवलीत नवा प्रयोग : ‘तारे जमीं पर’ पाहून अभिनेते नंदू माधव हरखले

In the era of TV era, boys in nature ..! | टीव्ही युगातली मुलं रमली निसर्गात..!

टीव्ही युगातली मुलं रमली निसर्गात..!

भुर्इंज : थोडी थोडकी नाही तर तब्बल १२५ चिमुरड्यांनी टीव्ही, मोबाईल गेमच्या विळख्यातून मुक्त होऊन मातीशी नातं जोडलेलं. मल्लखांबावर सरसर चढत आकाशाशी जडलेलं. स्वत:च्या कल्पनाशक्तीला वाव देत विविध कलाकृतीत घडलेलं आणि घेण्याची नाही तर देण्याची प्रवृत्ती जोपासलेलं अनोखं चित्र चिंधवली, ता. वाई येथे अभिनेते नंदू माधव यांनी पाहिलं आणि ‘तारे जमीं पर..’ पाहून तेही हरखून गेले.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि चिंधवलीतील चिकूच्या बागेत दररोज सकाळी आणि गावातील सभागृहात सायंकाळी या १२५ चिमुरड्यांचा आनंदमेळाच भरू लागला. वाईहून दररोज पहाटे ६ वाजता वाई जिमखान्याचे खेळाडू चिंधवलीत येऊन चिमुरड्यांना खांबावरचा आणि दोरीवरचा मल्लखांब शिकवू लागले.
या चिमुरड्यांनी हा अवघड खेळ एवढ्या जलदगतीने आत्मसात करायला सुरुवात केली की, वाई जिमखान्याचे राष्ट्रीय खेळाडू असणारे प्रशिक्षकही भारावून गेले. केवळ मल्लखांब नाही तर चित्रकला, हस्तकला, पथनाट्य, विविध खेळ अशा विविध माध्यमातून हे चिमुरडे मोकळ्या वातावरणात निसर्गाशी एकरूप होत स्वत:मधील कलांना स्वत:च वाव देऊ लागले. स्वत: कल्पनाशक्तीने तयार केलेले नाटक स्वत: सादर करताना भल्याभल्यांची दाद घेऊ लागले.
विविध चर्चांच्या माध्यमातून थेट देशाच्या, जगाच्या विविध समस्येवर मत नोंदवू लागले. प्रात्यक्षिकातून उपाययोजना सुचवू लागले. आपली मुलं एवढा विचार करतात? त्यांच्याकडे एवढी कल्पनाशक्ती आहे? असे प्रश्न पालकांनाच पडू लागले. या प्रेरणा समर कॅम्पच्या माध्यमातून अनेक पालकांना आपल्याच पाल्यांची जणू नव्याने ओळख झाली.
या कॅम्पचा सांगता सोहळा अभिनेते नंदू माधव यांच्या उपस्थितीत पार पडला. ‘कोणत्याही प्रसिद्धीशिवाय गेली वर्षभर सुरू असणारं हे काम थक्क करणारं आहे. गेली दीड वर्ष मी कोणत्याही सार्वजनिक समारंभात सहभागी झालो नव्हतो. मात्र या उपक्रमाची माहिती घेतली आणि येथे आलो. येथे येण्याचे सार्थक झाले आहे.
युरोपात श्रीमंती मोजण्याचे निकष वेगळे आहेत. तेथे कला, संस्कृती, साहित्य आणि भावी पिढीची क्षमता यावर श्रीमंती मोजली जाते. त्यादृष्टीने विचार केला तर चिंधवली खूप श्रीमंत आहे, हे दिसून येतं,’ असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी चिमुरड्यांनी सादर केलेल्या मल्लखांब प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी टाळ्यांच्या जोरदार गजरात प्रतिसाद दिला. आतापर्यंत राबवलेल्या उपक्रमांचे तसेच मुला, मुलींनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन उपस्थितांची दाद घेणारे ठरले. चिमुरड्यांनी स्वत: तयार
केलेल्या विविध भेटवस्तू देऊन नंदू माधव यांचे स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)

सर्वजण भारावून गेले...
सध्या समर कॅम्पसाठी मोठी फी आकारली जाते. मात्र या ठिकाणी एकही रुपया न घेता हा उपक्रम राबवला गेला. निसर्गाशी, मातीशी नातं जोडलं जाताना मनाची मशागत व्हावी, शारीरिक, बौद्धीक क्षमता वाढावी, कल्पनाशक्तीला वाव मिळावा, समाजभान निर्माण व्हावं या हेतूने या कॅम्पमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून संयोजनात सहभागी झालेले गावातील सर्वजण भारावून गेले होते.

संबंधिताचे कौतुक...
एकीकडे उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना विविध कला शिकवू असे सांगून शिबिराच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्या संस्थांची वर्दळ वाढली आहे. असे असताना इथे मुलांना मोफत देशी खेळ शिकविले जात आहेत, याबद्दल संबंधितांचे कौतुक होत आहे.

Web Title: In the era of TV era, boys in nature ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.