वणव्यामुळे पर्यावरणाचा होतोय ऱ्हास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST2021-02-08T04:33:32+5:302021-02-08T04:33:32+5:30
वाई : वनवणवा सप्ताहानिमित्त वन विभाग व शिवसह्याद्री अॅकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने पसरणी घाट व डोंगरात जाळ पट्टे काढण्याचा ...

वणव्यामुळे पर्यावरणाचा होतोय ऱ्हास!
वाई : वनवणवा सप्ताहानिमित्त वन विभाग व शिवसह्याद्री अॅकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने पसरणी घाट व डोंगरात जाळ पट्टे काढण्याचा उपक्रम रविवारी सकाळी ७ वाजता हाती घेऊन, वणवा लागण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी जाळपट्टे काढण्यात आले.
वाई तालुक्याच्या चारही बाजूने असणाऱ्या पर्वतांच्या रांगा ही या तालुक्याची शान आहे. परंतु या डोंगररांगांना लागणारा वणवा यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. वणव्यामुळे बोडके व काळेकुट्ट डोंगर करण्याचे दुष्कृत्य विघ्नसंतोषी लोकांकडून होत असल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होते.
वणवा रोखण्यासाठी काही सामाजिक संस्था, वन विभागाच्या मदतीने जाळपट्टे तयार करून वणवा रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत. वन विभागाकडून प्रसिद्धीच्या माध्यमातून वणवा रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येतात; परंतु समाजकंटक याला जुमानत नसून त्यांची मुजोरी वाढल्याचे चित्र सध्या वाई तालुक्यात दिसत आहे.
वन विभागाकडून ग्रामीण भागात विविध पद्धतीने पर्यावरणाविषयी जाहिरातीच्या माध्यमातून जंगल वाचवा, गैरसमजुतीतून वणवा लावू नये, वणवा लावल्याने जमिनीची धूप होते, वणवा लावणे कायदेशीर गुन्हा आहे. झाडे लावा झाडे जगवा, यासारख्या विविध प्रकारच्या जनजागृतीसाठी आवाहन केले जात आहे. वणव्यामुळे जंगलात व डोंगराळ भागात वास्तव्य करणारे अनेक सरपटणारे प्राणी, पशु-पक्षी हे आगीत भस्मसात होत आहेत. तसेच अनेक औषधी व दुर्मिळ वृक्षही गवताबरोबर आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. पशु-पक्ष्यांमध्ये घारी, गरुड, सर्व जातीचे साप, वटवाघूळ, ससे, कळवीट, रानडुकरे, रानमांजरे, कुत्री यांसारख्या अनेक छोट्या-मोठ्या पशु-पक्ष्यांनाही आगीची झळ पोहोचते. खासगी मालक स्वतःच्या बांधाला शेतातील मलमपट्टी करताना वणवा लावतात. त्याची झळ शेजारी असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्राला बसतो व त्यात अख्ख्येच्या अख्ख्ये डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. अशावेळी वन विभागाकडून अनेकवेळा संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई करून दंड आकारण्यात येतो. पसरणी घाटात दारुड्यांकडून अशी पर्यावरणाचा नाश करणारी कृत्ये केली जातात, अशा मद्यपींवर पोलिसांनी वन विभागाला सहकार्य करून कडक कारवाई करण्याची गरज आहे. वणवा लागू नये, यासाठी पर्यावरण संस्था रात्रं-दिवस काण करताना दिसत आहेत. याकामी वन विभागाचे त्यांना चांगले सहकार्य लाभत आहे. यासाठी प्रशांत डोंगरे, आशुतोष शिंदे, सर्वेश खरात, तृप्तेश खरात, शुभम घारे, ओमकार घारे, आकाश खांडेकर, मंगेश पडळकर, हृषिकेश कांबळे, किरण शिंदे, अविनाश पडवळ, गणेश कोकरे, शक्ती गायकवाड यांनी परिश्रम घेतले
(कोट)
वणव्यामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होते, यांचे पर्यावरणावर दुष्परिणाम होत असतात. वनवणवा सप्ताह चालू असून, वन विभाग, सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी यांच्या सहकार्यातून तालुक्यातील डोंगरातून जाळपट्टे काढण्याची मोहीम केली जाणार असून, नागरिकांनी वणवा लावू नये, वणवा लावल्यास दंड व शिक्षा होऊ शकते.
- महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल, वाई
07वाई
वन विभाग, सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी यांच्या सहकार्यातून वाई तालुक्यातील डोंगरातून जाळपट्टे काढण्याची मोहीम हाती घेतली होती.