उद्योजक अनिल अंबानी महाबळेश्वर मुक्कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:38+5:302021-05-03T04:33:38+5:30
महाबळेश्वर : प्रसिद्ध उदयोगपती अनिल अंबानी आणि पत्नी टिना अंबानी महाबळेश्वर मुक्कामी आले आहेत. त्यांनी येथील गोल्फ मैदानाला सायंकाळी ...

उद्योजक अनिल अंबानी महाबळेश्वर मुक्कामी
महाबळेश्वर : प्रसिद्ध उदयोगपती अनिल अंबानी आणि पत्नी टिना अंबानी महाबळेश्वर मुक्कामी आले आहेत. त्यांनी येथील गोल्फ मैदानाला सायंकाळी पत्नीसमवेत फेरफटकाही मारला. हे नागरिकांनी पाहिल्यानंतर पालिकेला याची माहिती मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदीतही मैदानावर फिरण्यासाठी आल्यामुळे पालिकेने संबंधित मैदानाची मालकी असलेल्या संस्थेला नोटीस बजावली. त्यानंतर मैदानाला टाळे ठोकले.
याबाबत माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन जाहीर केलेला आहे. याच काळात अनिल अंबानी हे पत्नी टिना अंबानीसह महाबळेश्वर येथे आले आहेत. ते सध्या उद्योगपती अनुम मेहता यांच्या लाल बंगल्यात मुक्कामी आहेत. अनेक दिवस येथे मुक्कामी असलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांना रोज सकाळ आणि संध्याकाळी चालण्यासाठी बाहेर पडण्याची सवय आहे. मुंबई असो वा महाबळेश्वर, ते वाॅक कधीच चुकवीत नाहीत. अंबानी दाम्पत्य रोज सायंकाळी गोल्फ मैदानावर फिरण्यासाठी येतात. याच ठिकाणी गावातील काही मंडळीही जातात.
या मैदानावर अंबानी दाम्पत्य रोज येतात हे समजल्यावर तेथे हळूहळू नागरिकांची गर्दी होऊ लागली.
लाॅकडाऊनमध्ये कोणालाही बाहेर पडता येत नाही. तरीही उद्योगपती मैदानावर येतात ही माहिती मुख्याधिकाऱ्यांना समजली. त्यांनी तातडीने याबाबत खात्री करून गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या क्लब या संस्थेच्या सचिवांना नोटीस काढली. या नोटीसमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सध्या लाॅकडाऊन नियामांतर्गत संचारबंदी केली असताना गोल्फ मैदानावर शहरातील अनेक नागरिक इव्हिनिंग वाॅकसाठी येत आहेत. नोटीस मिळताच तातडीने गोल्फ मैदान चालण्यासाठी बंद करावे. या ठिकाणी वाॅकसाठी नागरिकांना मनाई करावी, अन्यथा आपल्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
चौकट :
मैदानाला टाळे
पालिकेने बजाविलेल्या या नोटिसीची क्लबने गंभीर दखल घेऊन तातडीने गोल्फ मैदानाला टाळे लावले आहे. तसेच ही नोटीस प्रवेशद्वारावर लावून नागरिकांना हे मैदान बंद करण्यात आले आहे. पालिकेने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे शहरातून कौतुक होत आहे. आता इव्हिनिंग वाॅकसाठी कुठे जायचे? हा प्रश्न अंबानी यांना पडला आहे.
०२महाबळेश्वर
महाबळेश्वर येथील याच गोल्फ मैदानात उद्योजक अनिल अंबानी आणि टिना अंबानी फेरफटका मारत असतात. हे समजल्यानंतर पालिकेने नोटीस बजाविल्यानंतर हे मैदान बंद करण्यात आले. (छाया : अजित जाधव)