सिंचनाची वसना... निधीसाठी याचना !

By Admin | Updated: December 29, 2014 23:52 IST2014-12-29T20:16:42+5:302014-12-29T23:52:25+5:30

खर्च दुपटीने वाढला : चौदा वर्षांपासून रखडलेली योजना पूर्ण करायाला हवेत अजून ७० कोटी रूपये

The entreaty of irrigation ... solicitation for funding! | सिंचनाची वसना... निधीसाठी याचना !

सिंचनाची वसना... निधीसाठी याचना !

पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्याच्या कायम दुष्काळी भागाला वरदान ठरणारार वसना उपसा सिंचन योजना प्रकल्प गेल्या चौदा वर्षांपासून रखडला असून त्याच्या पुर्णत्वासाठी अजून किमान ७० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे जात असले तरी सध्या पैसे नसल्याचे कारण देऊन ठेकेदाराने काम बंद ठेवले आहे.
वसना योजनेचे सर्वेक्षण अनेकवेळा करण्यात आले. या योजनेचे गाजर दाखवून अनेक निवडणुका लढवल्या गेल्या. त्यामध्ये विधानसभेचे माजी सभापती माजी आमदार दिवंगत शंकरराव जगताप, माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील याांच्यासह माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही समावेश होतो.
शरद पवार यांच्या मूळ गावी नांदवळ, ता. कोरेगाव येथे दि. ९ मे २००० रोजी मान्यवरांच्या व स्वत: शरद पवारांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र तब्बल साडे चौदा वर्षे झाली तरी अजून या योजनेचा वनवास संपला नाही. ठेकेदाराने २०१२ साजी पहिला टप्पा पूर्ण केला.
या योजनेचे जलपूजन आसनगावच्या माळावर तत्कालिन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०१३ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिले होते. अद्याप दुसरा टप्पा पूर्ण झालेला नाही. पंपहाऊसचे ७५ टक्के तर ऊर्ध्वगामी नलिकेचे ६० टक्के काम झाले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी ठेकेदारास अजून किमान आठ कोटी रुपये आवश्यक आहेत. (वार्ताहर)


पूर्वेकडील गावांचा समावेशाचा प्रश्न प्रलंबित
वसना उपसा सिंचन योजना ही उत्तर कोरेगावच्या दुष्काळी भागासाठी प्रामुख्याने सर्वेक्षित करण्यात आली, मात्र वसना नदीच्या पश्मिेकडीलच गावे या योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात आली. पूर्वेकडील भावेनगर, पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, वाठारस्टेशन, तडवळे, सं. वाघोली, फडतरेवाडी, जाधववाडी, विखळे ही गावे कायम दुष्काळीच आहेत.
या गावांचा समावेश करण्यासाठी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदने दिली आहेत. मात्र अजून तरी त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जर या गावांचा समावेश करण्यात आला तर योजनेच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे.


दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी किमान दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे ठेकेदारानेकाम बंद ठेवले आहे. लवकर निधी उपलब्ध झाला तर मार्च २०१४ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होऊन त्यातील क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल.
व्ही. जी. चव्हाण, कार्यकारी अभियंता, वसना उपसा सिंचन योजना
===
कोणत्याही परिस्थिती निधी अभावी काम बंद पडणार नाही, लवकरात लवकर योजना पूर्ण करून उत्तर कोरेगावची दुष्काळी शेती ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दीपक चव्हाण, आमदार



वसना योजनेची प्रारंभी ७२ कोटी रुपये प्रकल्प किंमत होती. वाढत्या महागाईमुळे सद्य:स्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास १५० कोटी रुपयांवर खर्च जाण्याची शक्यता आहे. कारण आजपर्यंत झालेल्या कामावर ७० कोटी रुपये खर्च झाला आहे तर अजून ७० कोटींची गरज आहे.

Web Title: The entreaty of irrigation ... solicitation for funding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.