मतदार गुरुजींचा पावसातही उत्साह
By Admin | Updated: June 22, 2015 00:12 IST2015-06-21T23:22:52+5:302015-06-22T00:12:09+5:30
शिक्षक बॅँक निवडणूक : ९४.९३ टक्के मतदान; आज मतमोजणी

मतदार गुरुजींचा पावसातही उत्साह
सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अठरा केंद्रांवर ९४.९३ टक्के मतदान झाले. मात्र, आरळे, नागठाणे येथील केंद्रावर किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. भर पावसातही गुरुजींनी मतदान केले. दरम्यान, सोमवार, दि. २२ रोजी सकाळी आठ वाजता येथील भूविकास बँकेच्या सभागृहात मतमोजणी होणार असून, दुपारी बारापर्यंत निकाल अपेक्षित आहे.सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी २१ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. यौपकी १६ जागा या सर्वसाधारण गटातील तर उर्वरित ५ जागा राखीव आहेत. १६ गटांतील उमेदवारांचे मतदान निश्चित असले तरी राखीव पाच गटांत सर्वांना मतदानाचा अधिकार होता. शिक्षक बँकेसाठी एकूण नऊ हजार ३५४ मतदान होते. त्यापैकी ८ हजार ८८० मतदारांनी आपला हक्क बजावला. दोन्ही पॅनेलने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गुरुजींनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघप्रणित (दोंदे गट), प्रगती पॅनेल आणि प्राथमिक शिक्षक संघप्रणित (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट आणि संभाजीराव पाटील गट) परिवर्तन पॅनेल हे दोन्ही गट आमने-सामने आहेत. (प्रतिनिधी)
लक्षवेधी लढत
शिक्षक बँक निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी लढत नागठाणे, मायणी, आरळे, बरड-फलटण, दहिवडी या गटांत तर भटक्या जाती-विमुक्त जमाती प्रवर्गात लक्षवेधी लढत होत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.