रस्त्यावर अतिक्रमण अन् तलावात विहिरी! लँडमाफियांचे कारनामे
By Admin | Updated: December 4, 2014 23:41 IST2014-12-04T23:16:25+5:302014-12-04T23:41:29+5:30
फलटण पश्चिम भागात पाणी येताच जमिनी खरेदीचा सपाटा

रस्त्यावर अतिक्रमण अन् तलावात विहिरी! लँडमाफियांचे कारनामे
आदर्की : फलटण पश्चिम भागात लँडमाफियांनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जमिनी खरेदी करून धोम-बलकवडीचे पाणी येताच जमिनीचे सपाटीकरण करण्याची कामे सुरू केली आहे. मात्र, हे काम करत असताना रस्त्यावर अतिक्रमण, तर पाझर तलावात विहिरी खोदण्याचा सपाटा लावल्याचे दिसत असून याबाबत महसूल विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. हा भाग कायम दुष्काळी असताना गावातील दलालांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने पुणे-मुंबईच्या लँडमाफियांच्या घशात घातल्या आहेत. तालुक्यातील काही राजकीय लेबल असणाऱ्या लोकांनीही जमिनी खरेदी केल्या आहेत. काही रस्त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद नसल्याचा गैरफायदा घेऊन डांबरी रस्त्यापर्यंत अतिक्रमण केल्याने पुलाची रुंदी वीस फूट आहे तर रस्त्याची रुंदी फक्त दहा फूट राहिली आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे १९७२ व इतर दुष्काळात ठिकठिकाणच्या ओढ्यावर पाझर तलाव बांधून पाणी अडविल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली. परंतु लँडमाफियांनी सातबारा उताऱ्यावर पाझर तलावाची नोंद नसल्याचा गैरफायदा घेऊन तलावात मातीचा भराव टाकल्यामुळे नैसर्गिक पाणीसाठा कमी झाला आहे. तर काहींनी पाझर तलावात व तलावाखाली विहीर खोदून नैसर्गिक पाणी विहिरीत सोडले आहे. या प्रकारांकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर) धोम-बलकवडीच्या पाण्यावर डोळा या परिसरात गेल्या तीन वर्षांपासून धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यातून ओढ्याला पाणी सोडले जात आहे. त्या पाण्यावर डोळा ठेवून माळरानाचे सपाटीकरण करताना मोठ्या प्रमाणात मुरुम, मातीची खुदाई केली तर काही शेतकरी वर्गाने कृषी खात्याने पाणी अडविण्यासाठी जलसंधारणातून लाखो रुपये खर्चून बांधलेले नालाबांधही त्याची माती सपाटीकरणासाठी वापरल्याची चर्चा सुरू आहे.