‘अतिक्रमण’ हटावला अखेर मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:43+5:302021-09-06T04:43:43+5:30
सातारा : सातारा पालिकेकडून शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम जोमाने हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमण पथकाने पहिल्या ...

‘अतिक्रमण’ हटावला अखेर मुहूर्त
सातारा : सातारा पालिकेकडून शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम जोमाने हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमण पथकाने पहिल्या टप्प्यात फूटपाथ व रस्त्यावरील हातगाड्या, टपऱ्या व भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत शहरातील अतिक्रमणाच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. सभेत झालेल्या चर्चेनंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना तातडीने दिल्या. त्यानुसार अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने शहरात शनिवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे.
शनिवार व रविवारी मोती चौक, मंगळवार तळे मार्ग, राजवाडा परिसर येथील फूटपाथ व रस्त्याकडेला थाटण्यात आलेल्या टपऱ्या पथकाकडून जप्त करण्यात आल्या. फूटपाथवरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. अनेक महिन्यांनंतर पालिकेने ही मोहीम हाती घेतल्याने ठिकठिकाणे रस्ते, चौक व फूथपाथने मोकळा श्वास घेतला आहे. या कारवाईवेळी अनेकदा वादावादीचे प्रकारही घडू लागले आहेत.