परप्रांतिय व्यापाऱ्यांचे अतिक्रमण
By Admin | Updated: November 9, 2014 23:26 IST2014-11-09T22:10:08+5:302014-11-09T23:26:41+5:30
नागरिकांमधून नाराजी : सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

परप्रांतिय व्यापाऱ्यांचे अतिक्रमण
सावंतवाडी : शहरात परप्रांतिय व्यापाऱ्यांची संख्या वाढत चालली असून विक्रीसाठी शहरातील विविध ठिकाणच्या जागांवर त्यांचे अतिक्रमण होत आहे. मात्र, याकडे पालिकेने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. परप्रांतिय व्यापाऱ्यांच्या तुलनेत स्थानिक व्यापाऱ्यांकडून जागेचे भाडे दररोज वसूल केले जाते. स्थानिक व्यापाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाते, तर परप्रांतियांकडे पालिकेने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सावंतवाडी शहरात परप्रांतिय व्यापाऱ्यांची मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. झोपाळे, चादरी, कपडे, स्वेटर, फळे अशा प्रकारच्या सर्वच वस्तूंची विक्री परप्रांतिय व्यापारी बिनधास्तपणे फुटपाथवर अथवा इतर सार्वजनिक ठिकाणांवर बसून करतात. याचा त्रास फुटपाथवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना सहन करावा लागतो. मोती तलावाकाठी अनेक परप्रांतिय व्यापारी बिनधास्तपणे, कोणतेही शुल्क न भरता व्यापार करताना दिसतात.याबाबत नगरपलिका अशा व्यापाऱ्यांना कोणत्याही सूचना देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु एखादा स्थानिक व्यापारी अशाप्रकारे विक्रीस बसल्याचे आढळून आल्यास तत्काळ पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या मागे ससेमिरा लागतो आणि त्याच्याकडून दंड आकारला जातो. (वार्ताहर)
पालिकेच्या धोरणावर नाराजी
नियमाप्रमाणे मार्केटमध्ये बसून व्यापार करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यालाही शुल्क भरावे लागते. तर परप्रांतिय सावंतवाडी शहरात कोठेही बिनधास्तपणे ‘बिनभाड्याचा’ व्यापार करीत आहेत. त्यामुळे ‘स्थानिकांवर वक्रदृष्टी आणि परप्रांतियांवर कृपादृष्टी’ असे पालिकेचे धोरण दिसत असल्याचे सूर स्थानिक व्यापाऱ्यांतून उमटत आहेत. याची नोंद घेऊन स्थानिक आणि परप्रांतिय व्यापाऱ्यांना एकच न्याय द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे.