अतिक्रमण हटविले.. पदपथ बळकावले !
By Admin | Updated: May 12, 2016 23:56 IST2016-05-12T22:14:50+5:302016-05-12T23:56:21+5:30
बसस्थानकाजवळील प्रकार : बीओटी तत्त्वावर बांधत असलेल्या इमारतीसमोर पदपथावर रेलिंग

अतिक्रमण हटविले.. पदपथ बळकावले !
सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा शहरातून जाणाऱ्या मार्गाच्या रुंदीकरणात पादचाऱ्यांसाठी नुकत्याच बांधलेल्या पदपथाचे जन्मताच अपहरण झाले आहे. त्याच्या वापराचा पादचाऱ्यांना आनंद मिळण्याआधीच व्यावसायिकांसह बड्या धेंड्यांचीही त्याच्यावर धाड पडल्यामुळे शहरवासीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शहरातून जाणारा जुना हायवे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात एसटीची वाहतूक आहे. गेले काही दिवस मोळाचा ओढा ते गोडोली नाक्यापर्यंतच्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता शहरातून जात असल्याने पादचाऱ्यांना सुरक्षितपणे जाता यावे म्हणून रस्त्याच्या दुतर्फा पदपथ बांधले जात आहेत. त्यापैकी तहसीलदार कार्यालय कॉर्नर ते बसस्थानकापर्यंत आताच पदपथ झाला आहे. अजून अंगाची हळदही निघाली नाही म्हणतात त्याप्रमाणे अजून या नव्या पदपथावरून चालण्याचा लोकांनी आनंदही घेतला नाही, तोच बसस्थानकाशेजारी बीओटी तत्त्वावर बांधल्या जात असलेल्या महामंडळाच्या वास्तूसमोर पदपथाच्या बाहेर रेलिंग करून तो आपल्या मालकीचा असल्याप्रमाणे आत घेण्याचा पराक्रम चालला आहे. हे रेलिंगचे काम दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू होते. पण तरीही तेथून जेमतेम पाचशे मीटरवर असलेल्या बांधकाम विभागाने त्यात कसलाही हस्तक्षेप न केल्याने ही मिलीभगत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यासंदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पदपथ हा पादचाऱ्यांसाठीच असून, त्या विकसकाचे हे कृत्य बेकायदा असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. हा विभाग याची किती गंभीरपणे दखल घेतो, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या पदपथावर अन्य व्यावसायिकांनीही तत्काळ कब्जा केला असून, त्यावर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागणार आहे. परिणामी पादचाऱ्यांच्या नावाने लाखो रुपये खर्चून बांधलेला पदपथ नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी)