अतिक्रमण करायचंय; कातरखटावला या!
By Admin | Updated: February 6, 2015 00:40 IST2015-02-05T20:21:21+5:302015-02-06T00:40:19+5:30
ग्रामपंचायतीचा कानाडोळा : रातोरात उभी राहतायत शेड

अतिक्रमण करायचंय; कातरखटावला या!
कातरखटाव : ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कातरखटाव परिसरात रातोरात अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या सहा महिन्यांत ग्रामपंचायतीच्या जागेवर एका रात्रीत पत्र्याचे शेड तयार होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.शंभू महादेव कामेश्वराची पवित्र नगरी म्हणून कातरखटावची ओळख आहे. या ऐतिहासिक गावात सध्या मात्र वाढत्या अतिक्रमित शेडमुळे पाणी कुठे मुरतंय, अशा चर्चेला ऊत आला आहे. ग्रामपंचायत अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई का करीत नाही, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यातील काही पत्र्यांच्या शेड धोकादायक असल्यामुळे व्यापारी व ग्रामस्थांना त्रास होत आहे. अतिक्रमणांमुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. अतिक्रमणे हटवून योग्य ठिकाणी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली तरच व्यापारी व ग्राहक मोकळा श्वास घेणार आहेत. ग्रामपंचायतीच्या इमारतीला टार्गेट करून दुकाने थाटून अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यास जागा उरलेली नाही. बसस्थानक, शाळा, प्रमुख चौक आणि अन्य ठिकाणी अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या अनधिकृत शेडवर ग्रामपंचायत कधी कारवाई करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)