नगरपालिकेच्या उत्पन्नावर कर्मचाऱ्यांनी मारला हात
By Admin | Updated: January 2, 2015 00:13 IST2015-01-01T22:58:23+5:302015-01-02T00:13:24+5:30
महाबळेश्वर येथील घटना : अपहाराची रक्कम वसूल करून शिस्तभंगाची कारवाई

नगरपालिकेच्या उत्पन्नावर कर्मचाऱ्यांनी मारला हात
महाबळेश्वर : पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या वेण्णा लेक येथील बोट क्लबवर संगनमत करून पालिकेच्या उत्पन्नावर हात साफ करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी सचिन पवार व बोट क्लबचे अधिकारी उस्मान वारुणकर यांनी रंगेहाथ पकडले. या कर्मचाऱ्यांकडून अपहार केलेली रक्कम वसूल करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस स्थायी समितीकडे करण्यात आली आहे.
या बोट क्लबचे उत्पन्न मोठे असल्यामुळे भ्रष्टाचारही मोठा आहे. नेमणुकीसाठी कर्मचाऱ्यांत चढाओढ असते. नगरसेवकाकडे वशिला लावून कर्मचारी जागा पटकावतो. भ्रष्टाचार होऊ नये म्हणून पालिकेने कार्ड सिस्टिम सुरू केली आहे. नौकाविहार करण्यासाठी आलेल्या पर्यटकास कार्ड दिले जाते. ते कार्ड दुसरीकडील मशीनमध्ये नोंदवून बोट मिळते. बोटिंग करून आल्यानंतर पुन्हा कार्ड नोंदवून तिसरीकडील काउंटरवर पर्यटकाने भरलेली अनामत रक्कम परत मिळते. ही तिन्ही ठिकाणे एकमेकांपासून लांब आहेत. यामुळे भ्रष्टाचारास आळा बसून उत्पन्नात वाढ झाली आहे. मात्र, संबंधित तीन कर्मचाऱ्यांनी यावरही मात करून भ्रष्टाचार करत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. नाताळ व नववर्षामुळे दि. २५ ते २८ पर्यंत बोट क्लबला चांगले उत्पन्न मिळाले होते. दि. २९ आणि ३० या दिवशी उत्पन्न वाढण्याऐवजी चाळीस टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले. ही आकडेवारी पाहिल्यानंतर मुख्याधिकारी आणि बोट अधिकारी उस्मान वारुणकर यांनी दि. ३१ रोजी छापा टाकला. त्यावेळी सिस्टिम बंद असल्याचे निदर्शनास आले. कार्ड व बिलांची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
बबन जाधव, अहमद नालबंद व किशोर कांबळे यांनी अपहार केलेली रक्कम जमा केली असून, त्यांची बदली करून पुढील कारवाई करावी, अशी शिफारस मुख्याधिकाऱ्यांनी स्थायी समितीकडे केली आहे. (वार्ताहर)
अर्ध्या तासात चार हजारांचा अपहार
पर्यटकांकडील कार्ड व बिलांची तपासणी केली असता पर्यटकांना दिलेली कार्ड नोंदविली नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रकमेचा अपहार झाल्याचे उघड झाले. केवळ अर्ध्या तासात तीन हजार ८८० रुपयांचा अपहार केला होता. बोट क्लब दिवसातून १३ तास सुरू असतो. याच पद्धतीने दिवसभरात किती रकमेचा अपहार या कर्मचाऱ्यांनी केला असेल हे उघड होते.