म्हसवड यात्रेत प्रत्येक विभागाचा कर्मचारी

By Admin | Updated: November 11, 2014 00:04 IST2014-11-10T20:52:42+5:302014-11-11T00:04:37+5:30

मिनाज मुल्ला : नियोजन बैठकीत दिली माहिती

Employees of every department in the Mhaswad yatra | म्हसवड यात्रेत प्रत्येक विभागाचा कर्मचारी

म्हसवड यात्रेत प्रत्येक विभागाचा कर्मचारी

म्हसवड : ‘येथील श्री सिद्धनाथ यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी कंट्रोल युनिटचे नियोजन करून त्यात प्रत्येक विभागाच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश करणार आहे,’ अशी असल्याची माहिती प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली.
म्हसवड, ता. माण येथे यात्रेचे नियोजन करण्यासाठी सिद्धनाथ मंदिराच्या भक्त निवासामध्ये प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार महेश पाटील, गटविकास अधिकारी सीमा जगताप, तालुका आरोग्य विभागाचे दिलीप कुंभार, बांधकाम विभागाचे पी. जी. गाडे, पुरवठा विभागाचे किशोर बडबडे, मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील, नगराध्यक्ष विजय सिन्हा, विजय धट, माजी नगराध्यक्ष व मानकरी अजितराव राजेमाने, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी गुरव, सचिव राजकुमार गुरव, सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. कोरे, मोहनराव डुबल, सिदोजीराव डुबल आदी उपस्थित होते. दरम्यान सिद्धनाथ रथोत्सव दि. १५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान साजरा होत असून, यात्रेचा मुख्य दिवस दि. २३ नोव्हेंबर आहे.
प्रांत मुल्ला म्हणाले, ‘यात्रा व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी सर्वांची आहे. यात्रेचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक खात्याचा एक कर्मचारी असणारी एक कमिटी स्थापन करण्यात येईल. जोणेकरून भाविकांना कोणतीही अडचण आली किंवा यात्रा नियोजनामध्ये कोणतीही समस्या उद्भवल्यास उपाययोजना करणे सोपे जाणार आहे.’
प्रत्येक खात्याच्या कामाचा आढावा घेताना सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका व पोलीस स्टेशन यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवावी, असे सांगितले. देवस्थान ट्रस्टने दर्शनबारीची व्यवस्था करण्याबरोबरच हत्ती मंडपाच्या मागील बाजूस नारळ फोडण्याच्या सूचना केल्या. आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. डेंग्यूबाबत जागृती करून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळण्याची अंमलबजावणी होते की, नाही, याकडे लक्ष द्यावे. आरोग्य विभागातर्फे १०८ क्रमांकाच्या दोन व १०२ क्रमांकाच्या पाच रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सांगून यात्रा काळात पाच पथके स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)


२१ नोव्हेंबरनंतर मोठ्या वाहनांना ‘नो एंट्री’
बैठकीत पार्किंग व्यवस्थेच्या मुद्यावर जास्त चर्चा झाली. गेल्या वर्षी यात्राकाळात वाहतूक मोठ्या प्रमाणात विकस्कळीत झाली होती. या वाहतुकीत प्रांत व तहसीलदार यांच्या गाड्या अडकल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीबाबत ठोस नियोजन करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या. त्यावर सहायक पोलीस निरीक्षक कोरे यांनी पार्किंग शहराच्या बाहेर करण्यात येणार असून, तेथेच एस. टी. ची व्यवस्थाही करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी त्यांचा माल दि. २१ नोव्हेंबरपूर्वी आणावा. त्यानंतर मोठी वाहने शहरात सोडता येणार नसल्याचे सांगितले.

Web Title: Employees of every department in the Mhaswad yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.