आबांचा जोर... विरोधकांना मात्र घोर!

By Admin | Updated: August 24, 2015 23:14 IST2015-08-24T23:13:54+5:302015-08-24T23:14:54+5:30

लोणंद बाजार समिती : १७ जागांवर मोठ्या फरकाने विजय; काँग्रेसवर अंतर्मुख होण्याची वेळ

The emphasis is on the opponents! | आबांचा जोर... विरोधकांना मात्र घोर!

आबांचा जोर... विरोधकांना मात्र घोर!

दशरथ ननावरे ल्ल खंडाळा
आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने काँग्रेसप्रणित शेतकरी पॅनेलवर लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या फरकाने विजय मिळविला. खंडाळा तालुक्यात मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा गजर झाला. त्यामुळे काँग्रेसला आता अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.
लोणंद बाजार समितीत राष्ट्रवादीच्या पॅनेलने १७ जागा जिंकत आपण तालुक्यात नंबर एक असल्याचे सिद्ध केले. आमदार मकरंद पाटील यांचे नेतृत्व व जनसंपर्क यामुळे राष्ट्रवादीची मोठी फळी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर वाडी-वस्तीवर पोहोचलेली विकासकामे लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या प्रचंड यशानंतर बाजार समितीच्या विजयाचा तुराही राष्ट्रवादीने मानाने रोवला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतभेदानंतर आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांच्याशी पुन्हा सलगी करण्यात यश मिळविले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या प्रमुखांची एकसंध ठेवून नाराजी दूर करण्यातही आघाडी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे काम समन्वयाने झाले. त्यामुळेच सोसायटी मतदारसंघ व ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्व जागा मोठ्या फरकाने विजयी झाल्या. मापाडी व हमाल पंचायतीची जागाही राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी झाली. व्यापारी मतदार संघावर कायम काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळी त्यातील एक जागा खेचून आणण्यात राष्ट्रवादीला यश आले. काँग्रेसचे राहुल नागर हे व्यापारी मतदारसंघातून वैयक्तिक प्रभावातून निवडून आले. ग्रामपंचायती पाठोपाठ बाजार समितीतही काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी फिरवलेली पाठ आणि कार्यकर्त्यांची दिशाहीन कामगिरी यामुळे काँगेसला अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. तर तालुका काँग्रेसला बळ देण्यासाठी सक्षम नेतृत्वाचीही गरज आहे. गाव पातळीवर कार्यकर्त्यांना पक्षाकडून बळ दिले जात नसल्याचा सूर काँग्रेसमधून चर्चिला जात आहे. याऊलट आमदार मकरंद पाटील हे प्रत्येक गावाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. याशिवाय माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, सभापती रमेश धायगुडे, समन्वयचे अध्यक्ष शामराव गाढवे, हणमंतराव साळुंखे, राजेंद्र तांबे, रमेश शिंदे, राजेंद्र नेवसे, शिवाजीराव शेळके यासारखी मोठी फळी राष्ट्रवादीत जोमाने कार्यरत आहे.

Web Title: The emphasis is on the opponents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.