खो-खोच्या सरावावर भर द्यावा : संजीवराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:35+5:302021-02-13T04:37:35+5:30
फलटण : ‘कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली खेळाची मैदाने खुली होत असून खेळाडूंनी खेळाप्रति खिलाडूवृत्ती जपून खेळ खेळावा. ...

खो-खोच्या सरावावर भर द्यावा : संजीवराजे
फलटण : ‘कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली खेळाची मैदाने खुली होत असून खेळाडूंनी खेळाप्रति खिलाडूवृत्ती जपून खेळ खेळावा. सातत्यपूर्ण सरावावर भर द्यावा,’ अशी अपेक्षा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्हा ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, संस्कृती क्रीडा मंडळ व शिवगर्जना क्रीडा मंडळ, गिरवी यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित जिल्हास्तरीय खुला गट निमंत्रित खो-खो स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी रामदास कदम, राष्ट्रीय खेळाडू दादासाहेब चोरमले, प्रणील काकडे, महेश बोडरे, ओंकार कदम, संजय सावंत, संजय जाधव, विकास कदम उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘महाराष्ट्रात खो-खो खेळाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजाश्रय लाभला आहे. त्यांनी या खेळाचे अध्यक्षपद भूषविले आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्यानंतर आपल्याला महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्षपद सलग दुसऱ्यांदा मिळाले. हा माझा बहुमान असून या खेळाचा दर्जा देशामध्ये उंचावण्यासाठी भविष्यात काम करणार आहे. लवकरच खो-खो खेळाच्या प्रीमियर लीग स्पर्धा सुरू करण्याबाबत विचार आहे. खो-खो खेळामध्ये जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू दिले आहेत. भविष्यातही फलटण तालुक्यामध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्याची गरज असल्याचे संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
- भूपेश कदम यांनी आभार मानले.