चवणेश्वर पर्यटनस्थळ विकसित करण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:02+5:302021-09-06T04:43:02+5:30
पिंपोडे बुद्रुक : चवणेश्वर गावास मोठी निसर्गसंपदा लाभली असून, ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाच्या माध्यमातून या गावाची वेगळी ओळख आहे. पर्यटनस्थळ ...

चवणेश्वर पर्यटनस्थळ विकसित करण्यावर भर
पिंपोडे बुद्रुक : चवणेश्वर गावास मोठी निसर्गसंपदा लाभली असून, ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाच्या माध्यमातून या गावाची वेगळी ओळख आहे. पर्यटनस्थळ म्हणून या गावात जे जे करावे लागेल. ते करून गावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे,’ अशी ग्वाही आमदार दीपक चव्हाण यांनी दिली.
चवणेश्वर या ‘क’ वर्ग पर्यटनस्थळासाठी प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत १ कोटी ३३ लाखांचा निधी शासनाने मंजूर केला होता. या निधीतून एक कोटी रुपयांचा निधी घाटरस्त्यासाठी देण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, जिल्हा बँकेचे माजी संचालक लालासाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सतीश धुमाळ, संतोष पवार, जितेंद्र जगताप, चवनेश्वरचे सरपंच दयानंद शेरे, माजी सरपंच नीता पवार, सुरेश सूर्यवंशी, संभाजीराव धुमाळ पिलाजी धुमाळ, संदीप धुमाळ, बाबूराव पवार, सदाशिव जगताप, नंदकुमार देशमुख, हरिदास शेरे उपस्थित होते.
संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘चवणेश्वर गाव छोट असले तरी या गावाने राष्ट्रवादीला नेहमीच उच्चांकी मतदान दिले आहे. या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येथील ग्रामस्थांचे आर्थिक जीवनमान उंचावले पाहिजे, उद्योग, व्यवसाय उभारून ते भक्कमपणे उभे राहावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. येथील कोळी समाजाचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबर त्यांना महादेव कोळी जातीचे दाखले लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी पाठपुरावा करणार आहे. या गावातील लोक एकदिलाने चांगला विकास करीत आहे.’
मंगेश धुमाळ म्हणाले, ‘श्री चवणेश्वराचा आशीर्वाद घेऊनच आमची वाटचाल असून, या गावाच्या विकासासाठी जे शक्य आहे ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करीत आहे. आगामी काळातही या गावाच्या विकासात्मक वाटचालीत कुठेही कमी पडणार नाही.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग पवार, संजय सूर्यवंशी, बंडा शेरे, बाळू शेंडे, दत्तात्रय सूर्यवंशी, तात्याबा सपकाळ, अंकुश सूर्यवंशी, दगडू शेरे, अमोल शेरे, भीमराव शेरे, आदींनी परिश्रम घेतले. संतोष पवार यांनी प्रास्तविक केले. युवराज शेरे यांनी आभार मानले.
चौकट
दुसऱ्याच दिवशी कामास सुरुवात
चवणेश्वर रस्त्याचे काम नवनाथ वलेकर यांना मिळाले आहे. या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करण्याची सूचना आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.
फोटो
चवणेश्वर घाटरस्त्याच्या कामाचा प्रारंभ आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर, मंगेश धुमाळ, संजय साळुंखे, लालासाहेब शिंदे, दयानंद शेरे, जितेंद्र जगताप, सतीश धुमाळ उपस्थित होते.