आमदार नामधारी... कर्ते-करवितेच सत्ताधारी!

By Admin | Updated: June 15, 2014 00:14 IST2014-06-15T00:12:12+5:302014-06-15T00:14:56+5:30

राजनिष्ठेचा यशस्वी प्रयोग : मग कसं?... राजे म्हणतील तसं!

Eminent nomadari ... is the ruling party! | आमदार नामधारी... कर्ते-करवितेच सत्ताधारी!

आमदार नामधारी... कर्ते-करवितेच सत्ताधारी!

सचिन जवळकोटे ल्ल सातारा
फलटणचे भाग्यविधाते कोण? रामराजे. फलटणचे सर्वेसर्वा कोण? रामराजे. फलटणचे कर्तेकरविते कोण? रामराजे. अन् फलटणचे आमदारही कोण? रामराजेच! होय... फलटणमधल्या कोणत्याही लहान मुलाला विचारलं तर तो हेच सांगेल की ‘फलटणचे आमदार रामराजेच!’
आता तुम्ही म्हणाल, ‘मग मंत्रालयाच्या अधिकृत यादीत आमदार म्हणून दीपक चव्हाण यांचं नाव दिसतंय, ते कोण?’ अहो... ते तर निव्वळ नामधारी आमदार; कारण कर्ते-करवितेच घेतात, इथं प्रत्येक निर्णय आर या पार! मात्र काहीही म्हणा; ‘राजनिष्ठा’ किती प्रामाणिक असू शकते, हे इथल्या विद्यमान आमदारांनी फलटणच्या जनतेला दाखविलं राव.
फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर रामराजेंनी आपल्याच शाळेतला एक शिक्षक हेरला. ‘सत्तेची राजवस्त्रं’ नेसवून आमदारही केलं. मनात आणलं तर आपण एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किती मोठं करू शकतो, हे ही रामराजेंनी यातून दाखवून दिलं. विशेष म्हणजे, याची परतफेड चव्हाणांनीही मोठ्या इमानेईतबारे केली. तालुक्यातल्या विकासकामांच्या निधीबाबत कुणी चर्चा केली तर ‘रामराजेंना भेटा किंवा संजूबाबांना विचारा!’ ही एकच ठरलेली कॅसेट ऐकवली.
शाळेतल्या मस्टरवर त्यांनी जितक्या सहजपणे सह्या केल्या, तेवढ्याच विश्वासानं बंगल्यात ठेवलेल्या लेटरहेडवरही सह्या ठोकल्या. ‘मग कसं?’ असं कुणी विचारलं तर मोठ्या कौतुकानं ‘राजे म्हणतील तसं!’ एवढंच तोंडपाठ झालेलं उत्तर दिलं; परंतु यातून एक फायदा असा झाला की, तालुक्यातल्या गावोगावच्या समस्यांची खडान्खडा माहिती असलेल्या रामराजेंनी गेल्या पाच वर्षांत समतोल प्रमाणात निधी खर्ची आणला.
यंदा मात्र परिस्थती वेगळी. लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भलतंच जेरीस आणलेलं. ‘काँग्रेसला सोबत घेतलं नाही तर काय होऊ शकतं,’ याची चुणूकही दाखविलेली, कारण लोकसभेचा निकाल फलटणमध्ये भूकंप घडवून गेलेला. शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत या तालुक्यात ६०६ मतांचं आधिक्य घेऊन गेलेले. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचे बुरुज अनेक ठिकाणी ढासळलेले. अशा परिस्थितीत विधानसभेला आपल्या उमेदवाराचा चेहरा लोकांसमोर आणताना रामराजेंना खूप विचार करावा लागणार. खूप कसरत करावी लागणार. कारण, काँग्रेसचे दिगंबर आगवणे हेही बंडाच्या पावित्र्यात. लोकसभेला मुख्यमंत्र्यांचे ऐकणारे रणजितसिंह आता विधानसभेला शांत राहतील, याची शाश्वती खूपच कमी. अशातच आगवणे हे गिरवीचे म्हणजे, चिमणरावांच्याच गावचे. (गावाकडचा माणूस म्हणे कधीही जवळचाच असतो!)
असो. शिवसेनेचे बाबूराव माने यांनीही पुन्हा एकदा ‘बाणाची प्रत्यंचा’ ताणण्याचा मनसुबा जाहीर केलाय. त्यामुळं लढत तिरंगी होणार, हे निश्चित. मात्र, उत्सुकता एवढीच की, लोकसभेतल्या खोतांची अकडेवारी पुन्हा गिरवली जाणार की, रामराजेंची खरी ताकद विधानसभेत दिसून येणार!

Web Title: Eminent nomadari ... is the ruling party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.