टंचाईच्या काळात उधळपट्टी!
By Admin | Updated: November 13, 2015 23:43 IST2015-11-13T21:50:31+5:302015-11-13T23:43:46+5:30
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पाईपलाईनला गळती; अंधाऱ्या रात्री हजारो लिटर पाणी वाया

टंचाईच्या काळात उधळपट्टी!
शाहूपुरी : येथील शिवाजी नगर कॉलनी परिसरात प्राधिकरणाच्या पाईपलाईनला गळती लागली असून, अंधाऱ्या रात्रीत दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
एकीकडे जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळग्रस्त पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तर शाहूपुरी परिसरात गेले अनेक महिन्यांपासून प्राधिकरणाच्या अनेक पाईपलाईनला शिवाजीनगर, समतापार्क, जवाहर कॉलनी येथे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गळती लागल्यामुळे हा परिसर चिखलमय झाला असून, पाय घसरत असल्याने तेथून चालणेही धोकादायक बनले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून हीच परिस्थिती असूनही याकडे प्राधिकरण दुर्लक्ष करीत आहे. सध्या पावसाने मारलेली दडी चिंताग्रस्त असून, पाण्याचे साठे खालावत चालले आहेत. अशा परिस्थितीत हजारो लिटर पाण्याची नासाडी न परवडणारी आहे. वारंवार असे प्रकार घडत असूनही याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. गळती लागल्यामुळे वाहनचालक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
घाणीतूनच विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. गळती लागल्यामुळे हे पाणी रस्त्याच्या उताराने जात आहे. याठिकाणी तीव्र उतार असल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी करसत करावी लागत आहे. वाहने घसरण्याचे प्रमाणही वाढतच चालले आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
संबंधित विभागाने वेळेतच लक्ष घालून येथील पाईपलाईनची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पाणी बचतीचे महत्त्व प्राधिकरणला कधी कळणार, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
पाणीटंचाई यंदा लवकरच!
या वर्षी राज्यात सर्वत्र अपुरा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात तर परतीचा पाऊसही म्हणावातसा पडला नाही. दर वर्षी जाणवणारा पाणीटंचाई या वर्षी जानेवारीपासूनच जाणवू लागेल, अशी चिन्हे आहेत. सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर पाणी जपून वापरण्याचा सल्ला नागरिकांना वारंवार दिला जात आहे.
यापार्श्वभूमीवर गळती रोखणे हे संबंधित यंत्रणांचे कर्तव्य ठरते. मात्र, सातारा शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर सुरू असून ही एकप्रकारे पाण्याची उधळपट्टीच ठरते.