नाराज संचालकाची सत्ताधाऱ्यांना सोडचिठ्ठी!
By Admin | Updated: November 12, 2014 23:57 IST2014-11-12T20:58:53+5:302014-11-12T23:57:01+5:30
वसंतराव साळुंखे : ‘कृष्णा’ कारखान्यातील सत्ताबाह्य शक्तीच्या हस्तक्षेपाला कंटाळल्याचा आरोप

नाराज संचालकाची सत्ताधाऱ्यांना सोडचिठ्ठी!
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात सत्ताबाह्य शक्तीच्या हस्तक्षेपाला कंटाळून सत्ताधारी ‘संस्थापक’ पॅनेलला सोडचिठ्ठी देत असल्याचे ज्येष्ठ संचालक वसंतराव साळुंखे यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे़ दरम्यान, या घटनेने कार्यक्षेत्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे़
संचालक वसंतराव साळुंखे, तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष एम़ के़ कापूरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश साळुंखे यांनी संयुक्तिकरीत्या याबाबतचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे़ पत्रकात म्हटले आहे की, यशवंतराव कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गत निवडणुकीत सत्तांतर झाले़ संस्थापक पॅनेल सत्तेवर येऊन अविनाश मोहिते चेअरमन झाले़ या विजयात आमचा सिंहाचा वाटा आहे़
कारखान्याचा सुरुवातीचा काळ बरा गेला; पण त्यानंतर कारखान्याच्या कारभारात काहीही संबंध नसणाऱ्या बाह्य शक्तींचा हस्तक्षेप सुरू झाला़ आता तर तो हस्तक्षेप असहाय्य झाल्याने, त्याची दखल संबंधित घेत नसल्याने नाईलाजास्तव हस्तक्षेपाला कंटाळून आम्ही संस्थापक पॅनेलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे़
दरम्यान, संचालकांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानंतर सत्ताधारी संस्थापक गटातील सुरू असणारी धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे़ कृष्णेची निवडणूक नजीकच्या काळात होणार असल्याने ही धुसफूस कोणाच्या पथ्यावर पडणार अन् कोणाला डोकेदुखी ठरणार, याची चर्चा सभासदांच्यामध्ये सुरू आहे़
निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या तिन्ही गटांच्या नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे़ सत्ताधारी गटाच्या संचालकाची नाराजी हा त्याचाच भाग मानला जातो़ दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले हे नाराजी नाट्य संपले की, अजूनही पाहायला मिळणार? याचीही चर्चा होत आहे़ (प्रतिनिधी)
गुरव, पवार अन् आता साळुंखे !
दोन वर्षांपूर्वी यशवंतराव मोहिते कृृष्णा सहकारी साखर कारखान्याचे वाळवा तालुक्यातील संचालक अमोल गुरव व डॉ़ निवास पवार यांनी याच सत्ताबाह्य शक्तीवर अक्षेप घेत राजीनामे दिले होते़ त्यावेळीही राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती़ आता कऱ्हाड तालुक्यातील वसंतराव साळुंखे यांनी सत्ताबाह्य शक्तीवर आक्षेप घेत राजीनामा दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे़
साळुंखे, कापूरकर भोसलेंच्या गळाला ?
कृष्णेची निवडणूक यंदा तिरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ सत्ताधारी अविनाश मोहिते यांचे पॅनेल, मदनराव मोहिते व डॉ़ इंद्रजित मोहिते यांचे पॅनेल तर डॉ़ अतुल भोसले यांचे तिसरे पॅनेल रिंगणात असण्याची शक्यता आहे़ त्यामुळे नाराज संचालक वसंतराव साळुंखे, कामगार युनियनचे अध्यक्ष एम़ के़ कापूरकर हे भोसले गटाच्या गळाला लागणार असल्याचीच चर्चा सुरू झाली आहे़