नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना हवंय सक्षम नेतृत्व
By Admin | Updated: April 18, 2015 00:09 IST2015-04-17T22:19:26+5:302015-04-18T00:09:36+5:30
‘श्रीराम, सोमेश्वर’च्या निकालात साधर्र्म्य : फलटण अन् बारामती तालक्यातील मानसिकता पुन्हा एकदा स्पष्ट

नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना हवंय सक्षम नेतृत्व
नसीर शिकलगार - फलटण -नीरा खोऱ्यातील श्रीराम, माळेगाव व सोमेश्वर या कारखान्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये ऊसदरापेक्षा सक्षम नेतृत्त्वाच्या हाती सत्ता देण्याची मानसिकता सभासदांची दिसून आली. श्रीराम प्रमाणे सोमेश्वर कारखान्याच्या विजयातही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे मोठे योगदान राहिले.
नीरा खोऱ्यातील जुन्या व राजकीय पटलावर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना, शेजारील बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना या कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. तिन्ही ठिकाणी चुरशीने मतदान झाले; मात्र तिन्ही ठिकाणी उसाचा दर, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार, खासगीकरण हे विषय गाजले गेले. माळेगावचा अपवाद वगळता श्रीराम व सोमेश्वरमध्ये राष्ट्रवादीची म्हणजे सत्ताधाऱ्यांची सत्ता अबाधित राहिली. कारखाना सक्षमपणे चालविणाऱ्यांच्या हातील सभासदांनी सत्ता दिल्याने एकंदरी निष्कर्षावरून दिसून आले.
श्रीराम, माळेगाव व सोमेश्वर या तिन्ही कारखान्यांचा फलटणचा जवळचा संबंध आहे. शेजा-शेजारी असल्यामुळे फलटणचे माळेगाव व सोमेश्वरशी बरेचसे सभासद जोडले गेले आहेत. फलटण संस्थानाचे अधिपती दिवंगत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी ज्या उदात्त हेतूने श्रीराम कारखान्याची उभारणी केली, तोच उदात्त हेतू त्यांनी माळेगाव व सोमेश्वरच्या उभारणी व प्रगतीच्या बाबतीतही ठेवला.
‘श्रीराम’च्या निवडणुकीत विरोधकांमध्ये पडलेली फूट व सक्षम उमेदवार नसल्याचा विचार करीत सभासदांनी पुन्हा राजे गटाकडे कारखान्याची सत्ता दिली. अवसायनात निघणारा कारखाना कोणत्या न कोणत्या पद्धतीने जिवंत ठेवल्याचा त्यांना फायदा निवडणुकीत झाला.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा झालेला गलथान कारभारांमुळे माळेगावची सत्ता सभासदांनी विरोधकांच्या हाती दिली. त्यामागे विरोधक सक्षम कारभार करू शकतील, अशीच भावना होती.
रामराजेंनी जपली पक्षनिष्ठा
काकडे घराणे व नाईक-निंबाळकर घराणे एकमेकांचे नातेवाईक. मात्र, नात्या-गोत्याचा विचार न करता पक्षनिष्ठा जपत रामराजेंनी सत्ताधारी गटाला मोलाची मदत केली. सोमेश्वर विरोधक काकडे गटानेही काही काळ सोमेश्वरची सत्ता मिळविली होती. त्यामुळे पवार का काकडे यांचा विचार करताना काकडेंपेक्षा पवारांचा कारभार बरा, असे मानत सभासदांनी अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील गटाकडे सत्ता सुपूर्द केली.
‘माळेगाव’ पुनरावृत्ती टाळली...
माळेगावच्या निवडणुकीत हादरा बसल्याने राष्ट्रवादी अंग झाडून सोमेश्वरच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली. स्वत: अजित पवारांनी तळ ठोकून प्रचाराची सूत्रे हाती घेतली. सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील खंडाळा व फलटण तालुक्यांतील गावांवर रामराजे नाईक-निंबाळकर यांचा प्रभाव पाहता अजित पवार यांनी रामराजेंना हाताशी धरून त्यांची मदत घेतली.