वटवृक्षांच्या बचावासाठी एल्गार!
By Admin | Updated: May 15, 2015 00:03 IST2015-05-14T21:58:22+5:302015-05-15T00:03:55+5:30
साताऱ्यात संशोधक उपोषण करणार

वटवृक्षांच्या बचावासाठी एल्गार!
सातारा : वटवृक्ष तोडण्यास बंदी घालावी, या मागणीसाठी वटवृक्षांवर संशोधन करणारे प्रा. डॉ. आर. ए. तांबोळी लाक्षणिक उपोषण करणार असून, पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. प्रा. तांबोळी कोरेगावच्या डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागात आहेत. वडाची पाने कार्बन डायआॅक्साइड अधिक प्रमाणात शोषून घेतात आणि प्रदूषण कमी करतात, हे त्यांनी संशोधनाअंती सिद्ध केले असून, त्यांचे निष्कर्ष ‘अकॅडमी आॅफ प्लँट सायन्सेस’च्या ‘अॅडव्हान्सेस इन प्लँट सायन्सेस’ या शोधपत्रिकेने स्वीकारले आहेत. वटवृक्षांची कमी होत चाललेली संख्या आणि दिवसागणिक स्वयंचलित वाहनांची वाढती संख्या यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे ‘नो व्हेइकल डे’, सायकलला प्रोत्साहन अशा मागण्यांसाठी ते आग्रही आहेत. जागतिक पर्यावरणदिनी, ५ जूनला ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.