‘हत्ती’ मारणार आजपासून धडका!

By Admin | Updated: August 2, 2016 00:59 IST2016-08-02T00:41:51+5:302016-08-02T00:59:35+5:30

अतिवृष्टीची शक्यता : आश्लेषा नक्षत्रास मंगळवारपासून प्रारंभ

'Elephant' kills from today! | ‘हत्ती’ मारणार आजपासून धडका!

‘हत्ती’ मारणार आजपासून धडका!

सातारा : पुष्य नक्षत्रातील पावसानं सातारा जिल्ह्यातील नागरिकांना खरोखर म्हाताऱ्यासारखंच रूप दाखवलं. पंधरा दिवसांत फारसा पाऊस झालाच नाही. शेवट-शेवट अधूनमधून सरी कोसळत होत्या. या पावसानं सर्वांनाच आभाळाकडे बघायला लावलं होतं. परंतु मंगळवार, दि. २ पासून आश्लेषा नक्षत्र सुरू होत आहे. त्याचे वाहन हत्ती असून, नक्षत्राला सुरुवात होण्यापूर्वीच धडका मारायला हत्तीनं सुरुवातही केली आहे.
यंदा पर्जन्यमान चांगले असणार आहे. पावसाला वेळेतच सुरुवात होईल आणि नियमित पर्जन्यमानापेक्षा १०४ ते ११५ टक्के अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व पर्जन्यविषयक काम करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला होता. त्यामुळे सर्वांनाच हायसे झाले होते. सहा महिन्यांपासून पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत असलेल्या ग्रामस्थांनी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पडलेल्या पावसामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला होता.
आर्द्रा नक्षत्राला दि. २१ जूनला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन उंदीर होते. सुरुवातीचा पाऊस पश्चिम भाग असलेल्या सातारा, वाई, जावळी, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांत चांगला पडतो; पण उंदराने शेतकऱ्यांना दगा दिलाच. कोठेही पावसाचा जोर नसल्याने ओढे, नाले, नदी कोरडेच होते. आजही अनेक भागांतील कूपनलिका कोरड्या आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट आहे. पुनर्वसूचे वाहन असलेल्या कोल्ह्याने अपेक्षेप्रमाणे धुमाकूळ घातला; पण पुष्य नक्षत्राने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सूर्य मंगळवार, दि. २ रोजी रात्री ९ वाजून १ मिनिटांनी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्याचे वाहन हत्ती आहे. हत्ती धडका देईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील काही भाग वगळता उर्वरित जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारपासून तर पावसाचा जोर वाढला असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (प्रतिनिधी)


दोन दिवस अतिवृष्टी
मध्य महाराष्ट्रात दि.२ ते ४ आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या कालावधीत सुमारे ७० मिलिमीटरच्या आसपास पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याचाही मध्य महाराष्ट्रात समावेश होत असल्याने सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील हजारो नागरिकांना एसएमएस पाठवून सावधानतेचा इशारा दिला आहे.



कोयनेची मदार ‘आश्लेषा’वर
जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर हे पावसाचे महिने. त्यातील जून, जुलै महिना संपला तरी कोयना धरणात केवळ ६० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आश्लेषाचा चांगला पाऊस झाला तर लवकरच धरण भरू शकते. त्यामुळे धरणाची मदार आश्लेषा नक्षत्रावर आहे.
सावधानतेचा इशारा
या नक्षत्रात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली जात असून, काही ठिकाणी नुकसानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता पंचांगकर्त्यांनी वर्तविली आहे. त्यांच्या मते २, ३, ४, ६, ७, १०, १२, १३, १४, १५ आॅगस्ट रोजी चांगला पाऊस होतो.

Web Title: 'Elephant' kills from today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.