वीज मंडळाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:28+5:302021-02-05T09:11:28+5:30

खंडाळा : शेतकऱ्यांची शेतीपंपाच्या विजेची समस्या असो, वा ग्राहकांच्या घरगुती वापराची बिले असो वीज महामंडळाच्या कार्यालयात अनेकांना खेटे घालावे ...

Electricity Board officials on the farmers' dam .. | वीज मंडळाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर..

वीज मंडळाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर..

खंडाळा : शेतकऱ्यांची शेतीपंपाच्या विजेची समस्या असो, वा ग्राहकांच्या घरगुती वापराची बिले असो वीज महामंडळाच्या कार्यालयात अनेकांना खेटे घालावे लागतात हे चित्र नेहमी पहायला मिळते. मात्र याला फाटा देत खंडाळा उपविभागीय कार्यालयाने चक्क शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे काम केले आहे. वीज वितरण विभागाच्या या उपक्रमाचे शेतकरीवर्गातून कौतुक होत आहे.

वीज वितरण महामंडळाच्या खंडाळा उपविभागीय कार्यालयाने उपकार्यकारी अभियंता व्ही.आर. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत वीज मंडळाच्या पथकाने दररोज दोन ते तीन गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या भेटी घेऊन शेतपंपाबाबत समस्या जाणून घेतल्या आहेत. ज्या रोहित्रावर कनेक्शन दाब शिल्लक आहे, अशा ठिकाणी प्रलंबित शेतकऱ्यांची जागेवरच वीजजोडणी अर्ज घेऊन कनेक्शन दिले आहे. त्यामुळे सोळा शेतकऱ्यांचा शेतीपंपाचा वीज कनेक्शनचा प्रश्न निकालात निघाला आहे.

याशिवाय कृषिपंप योजनेत ग्राहकांचे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करून कृषी ग्राहकांच्या वीजबिलावरील थकबाकीचा तपशील महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. वीजबिलाबाबत तक्रार असल्यास मागील पाच वर्षांपर्यंतच्या बिलाची दुरुस्ती उपविभागीय कार्यालयामार्फत प्राधान्याने केली जात आहे.

जुन्या थकबाकीवर पाच वर्षांपूर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज माफ करण्यात येत आहे. सुधारित थकबाकी संगणकात निश्चित करून चालू बिल वेळेत भरल्यास थकबाकी तीन वर्षांत भरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार वीज भरणा करता येत आहे.

कोट...

शासनाच्या कृषिपंप योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. थकीत वीजबिलात सप्टेंबर २०१५ अखेर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित गावात जमा होणाऱ्या वीजबिलाच्या रकमेतील ३३ टक्के निधी गावातील वीजपुरवठा समस्या निवारणासाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे यातून गावकऱ्यांचीही सोय होणार आहे.

-व्ही.आर. शिर्के, उपकार्यकारी अभियंता

०३खंडाळा वीज वितरण

फोटो - गावभेटीदरम्यान शेतकऱ्यांना जागेवरच अर्ज घेऊन वीज वितरणचे अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन दिले.

Web Title: Electricity Board officials on the farmers' dam ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.