खासदारांना आवरल्यानेच निवडणूक सोपी
By Admin | Updated: March 2, 2017 23:46 IST2017-03-02T23:46:32+5:302017-03-02T23:46:32+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा दावा : आक्रमक कामकाजाद्वारे विरोधकांवर दहशत बसविण्याचे आवाहन

खासदारांना आवरल्यानेच निवडणूक सोपी
सातारा : ‘खासदारांना आम्ही सातारा व जावळी तालुक्यांत आवरून धरल्यानेच इतर तालुक्यांत राष्ट्रवादीच्या नेत्यांना निवडणूक सोपी झाली,’ असा दावा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी भवनात केला. आक्रमक कामकाजाद्वारे विरोधकांवर दहशत बसविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
येथील राष्ट्रवादी भवनात पक्षाच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, वाई तालुकाध्यक्ष प्रतापराव पवार, सुधीर धुमाळ यांची उपस्थिती होती.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ते सर्वच जिल्ह्यांत उमेदवार उभे करून राष्ट्रवादीला त्रास देण्याची शक्यता होती. मात्र, आम्ही त्यांना सातारा व जावळी तालुक्यातच आवरून धरले. खासदारांच्या गाडीवर दगडफेक झाली, यातूनच त्यांची दहशत संपल्यात जमा असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नूतन सदस्यांनी पक्षनिष्ठा कायम राखावी. विरोधकांना हाताशी धरून पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊ नका. कामात आक्रमकपणा दाखवला तरच विरोधक नमवतील,’ असा सल्लाही त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये काही पक्षांनी अमाप पैसा वाटला. आमच्या पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून त्या सत्ताधारी पक्षासोबत गेले. विधान परिषद निवडणुकीतील अनुभव पाहिल्यानंतर पक्षाशी व नेत्यांशी प्रामाणिक असणाऱ्या उमेदवारांनाच तिकिटे दिली. नूतन सदस्यांनी सुरुवातीला मतदार संघाचा दौरा करावा. कामाचा तक्ता तयार करावा, आता कामाला लागूया, पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन काही करू नका.’
मानकुमरे जामीन घेऊनच सत्काराला
जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य वसंत मानकुमरे हे जामीन घेऊनच सत्काराच्या कार्यक्रमाला आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना विजयी मिरवणूक काढता आली नव्हती, मात्र सत्काराच्या ठिकाणी ते जामीन घेऊनच आल्याची कोटी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.