निवडणुकीचे रणशिंग; गुडघ्याला बाशिंग!
By Admin | Updated: July 17, 2016 01:06 IST2016-07-16T21:16:39+5:302016-07-17T01:06:20+5:30
मेढ्यात अनेकांची तयारी : ‘बाहेरून शह अन् आतून तह’वरच लक्ष्य; आजी-माजी सदस्यही रिंगणात उतरणार -- मेढा नगरपंचायत, मोर्चेबांधणी

निवडणुकीचे रणशिंग; गुडघ्याला बाशिंग!
आनंद गाडगीळ -- मेढा जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले. अन् राजकीय चर्चेबरोबरच तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ४५०० लोकसंख्या प्रमाण मानून १७ सदस्य संख्या ठरली आहे. मेढा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांसह काही माजी सदस्यही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, निवडणुकीचे रणशिंग अन् गुडघ्याला बाशिंग बांधणारे बाहेरून शह आतून तह करणार काय? याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, भाजपा, आरपीआय समोरासमोर उभे ठाकणार का? या चर्चेने मात्र सध्या मेढा शहरात गरमागरम वातावरण आहे.मेढा शहरासह जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली निर्विवाद सत्ता, अंतर्गत गटाची धुसफूस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांच्यातील श्रेयवादावरून सुरू असलेले शीतयुद्ध अन् नगरपंचायतीच्या घोषणेपासून शिवसेना, भाजपा, आरपीआय यांनी सुरू केलेली मोर्चे बांधणी, माजी आमदार सदाशिव सपकाळ यांची गुलदस्त्यातील भूमिका या साऱ्या पार्श्वभूमीवर मेढा नगरपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार असेच सध्याचे चित्र आहे.
मेढा शहरासाठी असलेल्या १७ प्रभागांपैकी अपेक्षेप्रमाणे प्रभाग क्र. १, २ व ३ हे राखीव जागांसाठी आरक्षित झाले आहेत. या तीन प्रभागांमध्ये अंतर्गत चढाओढ असली तरीही आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार या तीनही प्रभागांत निवडणूक होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. तर उर्वरित १४ प्रभागांमध्ये चुरस राहणार असेच वाटते. मेढा नगरपंचायतीसाठी प्रभाग रचना करताना गुगल मॅपिंगद्वारे व झिगझॅग पद्धतीने प्रभाग रचना केली असल्याने समोरासमोरचे मतदार आता एका प्रभागात दिसणार आहेत. मात्र, श्री गणेश मंदिर परिसरातील प्रभाग हे या पद्धतीने न केल्याने येथे हरकत घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच काही प्रभाग हे नेत्यांच्या सोयीचे झाल्याची चर्चा आहे.
नगरपंचायतीच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी व शिवसेनेत रंगलेला कलगीतुरा त्यातच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांना दिलेला घरचा आहेर यामुळे वातावरण नक्कीच गढूळ झाले. मात्र, त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले अमित कदम यांच्या बरोबरचे मतभेद संपल्याचे जाहीर केले. मात्र, अमित कदम यांच्या अनुपस्थितीत आमदार भोसले यांनी मतभेद संपुष्टात आल्याचे जाहीर करणे, अन् त्याचबरोबर अंतर्गत धुसफूस न थांबल्यास स्वतंत्र पॅनेल उभे करण्याची घोषणा करणे या दोन्ही घोषणा राष्ट्रवादीच्या गोटातील अस्वस्थता सांगतात, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मेढा शहरात पांडुरंग जवळ व चंद्रकांत देशमुख या जोडीचीच सत्ता राहिली आहे. सत्तेच्या चाव्या आपणाकडेच राहतील या पद्धतीने राजकारण केले. यावेळीही दोघे आज तरी हातात हात घालून आहेत.
मेढा शहराच्या राजकारणात जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांनी आजपर्यंत कधीच लक्ष घातले नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, मेढा शहरात अमित कदम यांना मानणारा, माजी आमदार सदाशिव सपकाळ यांना मानणारा मतदार नक्कीच आहे. त्यामुळे या निवडणुकीत या दोघांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. मेढा शहरात असणाऱ्या १७ प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात सर्वसाधारणपणे २५० ते ३०० मतदार आहेत. त्यामुळे चुरस नक्कीच आहे. या दोघांबरोबरच राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असलेल्या मेढा शहरात शिवसेनेचाही मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, सध्या सेना-भाजप-आरपीआयची भूमिका शहाची राहणार की तहाची याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मेढा शहरात भाजपाची फार ताकद नसली तरीही भाजपाचा मतदार कासवाच्या गतीने वाढत आहे. आरपीआचे संजय गाडे यांनी तर सेना-भाजपाबरोबर महायुती करून लढण्याची भूमिका घेतली आहे. मेढा ग्रामपंचायतीच्या काळात तालुक्याचे ठिकाण असून देखील राहिलेल्या अनेक समस्या गावच्या अपेक्षेप्रमाणे न झालेला विकास, मेढा प्रादेशिक नळ योजनेच्या गैरकारभाराची चर्चा हे मुद्दे या निवडणुकीत राहणार असल्याचे सध्या चित्र आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात धुसफूस
एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत असलेली धुसफूस. सेना, भाजपा, आरपीआयची रणनीती. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजेंची व्यूहनीती, अन् तळ्याच्या काठावर उभे असलेल्यांच्या भूमिकेवर मेढा नगरपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार की एकमेकांच्या पायात पाय घालून पाडायला निघालेले हे सारेजण ‘सारे काही सत्तेसाठी’ असे म्हणत शहाचे तहात रूपांतर करणार हे ठरण्यास मात्र थोडा कालावधी जाणार असेच सध्याचे चित्र आहे.
तरच चुरस वाढणार...
सेनेचे संजय सपकाळ, सचिन करंजेकर, सचिन जवळ, प्रवीण पवार, भाजपाचे विठ्ठल देशपांडे, आरपीआयचे संजय गाडे राष्ट्रवादी समोर कसे उभे राहतात यावर निवडणुकीची चुरस ठरणार आहे.