‘सलून’ टिकविण्यासाठी वडीलधाऱ्यांची धडपड!
By Admin | Updated: July 27, 2016 00:26 IST2016-07-27T00:20:31+5:302016-07-27T00:26:25+5:30
वीर जिवाजी नाभिक समाज : अॅडव्हान्स ब्युटीशियनचे मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

‘सलून’ टिकविण्यासाठी वडीलधाऱ्यांची धडपड!
सातारा : सलूनचा परंपरागत व्यवसाय आहे... वडील, मोठा भाऊ तोच करतात... यामध्ये पैसा नाही असेही नाही... तरी नव्या पिढीचा ओढा भलतीकडेच आहे. हे चित्र सर्रास पाहायला मिळते. हे चित्र बदलण्यासाठी नाभिक समाजातील वडीलधाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. तरुणांना याकडे आकर्षित करण्यासाठी मोफत अॅडव्हान्स ब्युटीशियन प्रशिक्षण आयोजित केले आहे.
आपणाकडे बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात होती. यामध्ये गावातील सर्व गरजा गावातच भागविल्या जात होत्या. प्रत्येक कारागिराला वर्षभर काम मिळत होते. अलीकडील दोन दशकांपासून बारा बलुतेदारी परंपरेला खिंडार पडले. दुकानात जाऊन बसण्यास नव्या पिढीला कमी पणाचे वाटू लागले. काही शिक्षण घेऊन पुणे-मुंबईला जाऊन नोकरी करू लागल्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
सलून व्यवसाय गावोगावी सुरू आहे. या व्यवसायाला कधीही शेवट असू शकत नाही. यामध्ये पैसाही बक्कळ मिळू लागला आहे. त्यामुळे साहजिकच नाभिक समाजाशिवाय इतर मंडळीही याकडे वळू लागले आहेत; पण नाभिक समाजातील तरुणाई यापासून दूर जाऊ लागली आहे. ही खंत या समाजातील वडीलधाऱ्यांना सतावत आहे.
या व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी, तरुणांना याकडे आकर्षित करण्यासाठी वीर जिवाजी नाभिक समाज सातारा शहर संघटनेच्या वतीने सलून अॅडव्हान्स ब्युटीशियन मोफत प्रशिक्षण आयोजित केले आहे. आयडीबीआय बँकेच्या स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविला आहे. या पद्धतीचे प्रशिक्षण यापूर्वी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे आयोजित केले होते. या प्रशिक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील काही मुलांना पाठविण्यात आले होते. त्यानंतर हे शिबिर दि. १ आॅगस्टपासून एक महिन्यासाठी आयोजित केले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीर जिवाजी नाभिक समाज शहर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
निवास अन् भोजनाची मोफत सोय
एक महिन्याच्या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता आठवी पास असून, वयोमर्यादा १८ ते ४५ आहे. यामध्ये सहभागी झालेल्यांसाठी जेवण व भोजनाची मोफत सोय केली आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन
एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असेच आर्थिक साह्यही बँकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.