सातारा : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज देशात दुमदुमत होता. पण, नाशकात बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचे पाप करण्यात आले. खरे म्हणजे हा दुर्दैवी आणि पोरकटपणाचा प्रकार आहे. नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार फिरवता येणार नाहीत. त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण येथे खरी ठरली,’ असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत. त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘२०१९ मध्ये स्वत:चा वैयक्तिक स्वार्थ, खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि विचार सोडले. निवडणुकीतही लोक बरोबर राहत नाहीत म्हणून स्वार्थासाठी तडजोड केली. लोकांच्या मनातूनच साफ उतरल्याने त्यांच्याजवळ कोणी थांबत नाही. म्हणूनच नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा नकली आवाज काढण्याचे पाप केले. या गारगोट्यांनीच व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ज्यांचा विरोध आणि तिरस्कार केला. त्यांच्याच मांडीवर बसण्याचे पापही त्यांनी केले आहे. आपलं पाप झाकण्यासाठी बेजबाबदार वर्तनाचं समर्थन सुरू केलं आहे.
आमच्यावर आरोप केले. आरोपांचा किस काढला. तरीही निवडणुकीत २० जागा मिळवल्या. आम्ही ८० जागा लढवून २० जिंकल्या. एआयचा आवाज काढून बाळासाहेबांचे विचार बदलू शकत नाही. एकनाथ शिंदेबद्दल मत बदलू शकत नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या दाढीची त्यांना चिंता आहे. या दाढीनेच भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली होती. टांगा पलटी आणि घोडे फरार झाले होते. बाळासाहेब यांचा नकली आवाज काढल्याने सोडून जाणारी माणसे थांबतील हा त्यांचा भ्रम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधलं. काश्मीरमधील ३७० कलम हटवलं. त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. पण, ते शिव्याशाप देतात. वक्फ बोर्डाची लाखो एकर जमीन होती. हे लाटण्याचे काम सुरू होते. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे याचा फायदा सर्वसामान्य आणि गरीब मुस्लिम समाजाला होईल, अशी भूमिका होती, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले
मला गाव आहे; ते लंडनला जातात...
मी गावी आलो तरी त्यांना चिंता असते. गाव माझं आहे. त्यांना गावं नाहीत. ते लंडनला जातात. त्यांना थोडी जर वाटत असेल तर त्यांनी पाेरकट आणि थिल्लरपणा सोडावा. बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करू नका. तसेच त्यांना वेदना होतील, असे कामही करू नका, असा सल्लाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.