सडकसख्याहरींना आठशे रुपये दंड
By Admin | Updated: November 26, 2014 00:02 IST2014-11-25T22:14:46+5:302014-11-26T00:02:19+5:30
शाहूपूरी पोलिसांची कारवाई : मुलींना त्रास देणाऱ्यांवर बडगा

सडकसख्याहरींना आठशे रुपये दंड
सातारा : शाहूपुरी पोलिसांनी सडकसख्याहरींच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी पोलिसांनी न्यू इंग्लिश स्कूल परिसरात पाच सडकसख्याहरींना आठशे रुपये दंड करण्याबरोबरच त्यांना समज देवून सोडून देण्यात आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सडकसख्याहरींच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी न्यू इंग्लिश स्कूल परिसरात सडकसख्याहरींच्या विरोधात मोहीम राबविली. या कारवाईत हवालदार विश्वनाथ मेचकर, धनंजय कुंभार, मोहन पवार सहभागी झाले होते.
सकाळी साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या न्य इंग्लिश स्कूलच्या परिसरातील तसेच इतर कॉलेजमधील मुले रस्त्यावरच गाड्या आडव्या लावून वाहतुकीची कोंडी करतात. अनेकदा कर्कशपणे हॉर्न वाजवून त्रास देणे, मुलींसमोर शेरेबाजी करणे असे वर्तन करतात. अनेकदा युवक ट्रीपल सीट असतात. त्या अनुषंगाने शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या.
मंगळवारी येथे राबविण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, ही कारवाई सुरू झाल्याची माहिती अन्य सडकसख्याहरींना मिळताच त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातून तत्काळ पोबारा केला. (प्रतिनिधी)