सातारा : इन्फोसिसच्या माध्यमातून साताऱ्यात आय. टी. कंपनी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासित करून इन्फोसिसने आयटी क्षेत्राशी संबंधित केंद्र साताऱ्यात उभारण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी इन्फोसिसच्या संस्थापक खासदार डॉ. सुधा मूर्ती यांच्याकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ती मदत करण्याचे आश्वासन मूर्ती यांनी दिले.इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका व राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.संसदेतील पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी महिलांच्या आरोग्य, जागतिक वारसास्थळे, विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, दुर्ग व देशांतर्गत पर्यटन या मुद्यांचा उल्लेख केला, त्याबद्दल उदयनराजे भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले.डॉ. मूर्ती म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी कालावधीत रयतेचे राज्य निर्माण केले. जगाला हेवा वाटावा, असे अनेक पराक्रम केले. लोकशाहीचा पाया रचला. त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे कार्य आपण केले पाहिजे.तर मूर्ती दाम्पत्याच्या इन्फोसिस कंपनीने देशाच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी प्रतापगड प्राधिकरणचे सदस्य चंद्रकांत पाटील, काका धुमाळ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य संग्राम बर्गे, ॲड. विनित पाटील, संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
इन्फोसिस साताऱ्यात आणण्यासाठी प्रयत्न, उदयनराजे यांची सुधा मूर्ती यांच्याशी सकारात्मक चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 16:59 IST