साताऱ्याला स्मार्ट सिटीत समावेशासाठी प्रयत्न : उदयनराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:30+5:302021-06-09T04:47:30+5:30
सातारा : ‘सातारा शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही भेटणार आहोत. याबाबत पीएमओ ...

साताऱ्याला स्मार्ट सिटीत समावेशासाठी प्रयत्न : उदयनराजे
सातारा : ‘सातारा शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही भेटणार आहोत. याबाबत पीएमओ कार्यालयाशी चर्चा झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनाही भेटून सातारा पोर्टेबल वॉटरचा पायलट प्रोजेक्ट राबविणार आहोत. त्यासाठी लागतील ते प्रयत्न आणि पाठपुरावा आम्ही स्वत: करणार,’ अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी शासकीय विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सातारा जिल्ह्यातील शहरे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. सध्या केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानामुळे अनेक गावे ओडीएफ आणि ओडीएफ प्लस होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असलेली शौचालयांमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. स्मार्ट सिटी होण्यासाठी अनेक नवनवीन स्मार्ट संकल्पना आणि उपक्रम राबवावे लागतील. या स्मार्ट सुविधांचा उपयोग सामान्यांपासून सर्वांना होईल. विकासाकडे झेपावयाचे असल्यास, आपली दिनचर्या खरोखरच स्मार्ट करणे आवश्यक होणार आहे. या स्मार्ट सुविधांचा सदुपयोगदेखील रोजच्या रोज करणे तितकेच जरुरीचे असणार आहे. स्मार्ट सिटीकरिता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही भेटून विनंती करणार आहोत, असे उदयनराजे म्हणाले.
साताऱ्याविषयी पंतप्रधानांना विशेष आस्था आहे. त्यामुळे सातारकरांच्या हितासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून स्मार्ट सिटी बनवण्याकरिता आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही खासदार उदयनराजे यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यात ११ धरणे आहेत. त्याचप्रमाणे अनेक बंधारे, के.टी.वेअर आहेत. तथापि भौगालिक परिस्थितीमुळे पश्चिम भाग अतिवृष्टीचा आणि पूर्वभाग अवर्षणग्रस्त आहे. याचा विचार करून, पोर्टेबल वॉटरचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प साताऱ्यात राबविण्यात येणार आहे. त्याकरिता केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना भेटून त्यांना तसा प्रस्ताव देण्यात येईल आणि जरूर तो पाठपुरावा व कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहितीही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. या वेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मिशन हॉस्पिटलचे वाईचे संचालक रॉबर्ट मोझेस आदी उपस्थित होते.