शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला पवार-बाबरवस्ती वर्ग
By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:25:02+5:302016-03-16T08:29:50+5:30
सकाळ सत्रातील शाळांना भेटी : विद्यार्थी खूश मात्र शिक्षकांनी घेतला धसका

शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला पवार-बाबरवस्ती वर्ग
कुडाळ : जिल्हा परिषदेने १५ मार्चपासून सकाळ सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही दिलासा दिला. तर या निर्णयाचे शिक्षणसंघटनांनी शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांचे आभार मानले. दरम्यान, मंगळवारी सकाळ सत्रातील शाळेच्या पहिल्याच दिवसांपासून शिक्षणाधिकारी गुरव यांनी शाळा भेटींना सुरुवात केल्यामुळे शिक्षकांनी चांगलाच धसका घेतला आहे. सातारा तालुक्यातील पवार-बाबरवस्ती शाळेस भेट देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी चक्क पाठ घेतला.
प्राथमिक शिक्षण विभागाने ज्ञानरचनावाद प्रभावीपणे राबवून राज्यपातळीपर्यंत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. त्यामुळे शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यासह पदाधिकारी हे नेहमी शिक्षकांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतात. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता ओळखून जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळा सकाळ सत्रात घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार मंगळवारपासून सुरू झालेल्या सकाळच्या सत्रातील शाळांना भेटी देण्याच्या उद्देशाने शिक्षणाधिकारी गुरव यांनी थेट कण्हेर गाठले. यावेळी त्यांनी पवार-बाबरवस्ती शाळेत इयत्ता चौथीचा संतवाणी पाठ विद्यार्थ्यांना शिकविला. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका ज्योती माळी, वैशाली गायकवाड यांनी आपण राबवित असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. (प्रतिनिधी)
शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यापनाने विद्यार्थी भारावले
शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यापूर्वी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करीत होत्या. त्यामुळे त्यांनी अनेक वर्षांनंतर विद्यार्थ्यांशी असा सुसंवाद साधला. यावेळी त्यांना शिकविण्याचा मोहन आवरला नाही. चौथीच्या पाठ्यपुस्तकातील भाषेचा पाठ त्यांनी शिकविला. त्यांच्या अध्यापनाने विद्यार्थी भारावून गेले. तर त्यांच्या अचानक शाळा भेटींमुळे शिक्षकांची चांगलीच भंबेरी उडाली. यापुढे दररोज किमान पाच शाळांना भेटी देण्याचा त्यांनी कार्यक्रम ठरवला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम असून, शिक्षक प्रामाणिकपणे आपले ज्ञानदानाचे काम करीत आहेत. त्यामुळे शिक्षण अधिकारी म्हणून शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी प्रशासन उत्तम चालविण्याच्या दृष्टीने माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.
-पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी