खाद्यतेल महागच; कांदा दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST2021-05-24T04:37:07+5:302021-05-24T04:37:07+5:30
सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून अजूनही उतार आलेला नाही, तर दुसरीकडे पालेभाज्या स्वस्तच आहेत. फक्त ...

खाद्यतेल महागच; कांदा दरात वाढ
सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून अजूनही उतार आलेला नाही, तर दुसरीकडे पालेभाज्या स्वस्तच आहेत. फक्त वाटाणा भाव खाऊ लागला आहे. सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला ९ हजारांपर्यंत भाव मिळू लागलाय. त्याचबरोबर कांदा दरात थोडी सुधारणा आहे.
सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यांतूनही काही माल येत असतो. मागील काही दिवसांत आवक कमी झाली आहे.
सातारा बाजार समितीत रविवारी ९३३ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. कांदा ३०५, बटाटा १७५, लसूण १६ आणि आल्याची ६ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, चिकू, कलिंगड यांची आवक झाली. द्राक्षे आणि खरबुजाची आवक थांबली आहे.
सोयाबीन तेल दरात वाढ
खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे शेंगदाणा व सूर्यफूल तेलाचा ग्राहक सोयाबीनकडे काही प्रमाणात वळला आहे. सोयाबीन तेल दर वाढला आहे. सोयाबीनचा डबा २३५० ते २४५० पर्यंत मिळत आहे. पामतेल २२००, सूर्यफूल २६०० ते २७०० आणि शेंगदाणा तेल डबा २७०० ते २८०० पर्यंत मिळत आहे.
आंब्याची आवक टिकून
सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, आवक होत आहे. या रविवारी आंब्याची ७१ आणि कलिंगडाची १५ क्विंटलची आवक झाली. आंब्याची आवक टिकून आहे.
गवारीची आवक
बाजार समितीत वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला १०० ते १२०, गवार आणि दोडका ३०० ते ४००, मिरचीला २०० ते २५० रुपये दर १० किलोला मिळाला. तसेच कांद्याला क्विंटलला १४०० तर लसणाला ८ हजारांपर्यंत दर मिळाला. दरात सुधारणा झाली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे मंडया बंद आहेत. भाजीपाला कोठूनतरी गुपचूप खरेदी करावा लागतो. पेठेत विक्रेते येतात. त्यांच्याकडून खरेदी करतो. मंडईपेक्षा दर अधिक असतो.
- राकेश पवार, ग्राहक
गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. दरात तेजी असल्याने सोयाबीन तेलाला मागणी आहे. अजून काही दिवस खाद्यतेलाचे दर तेजीतच राहतील.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी कमीच आहे. बाजार समितीतही शेतमालाला दर कमी आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तरी निघणार का, हा प्रश्न आहे.
- शांताराम पाटील, शेतकरी