गावोगावी उपमार्गाला समस्यांचे ग्रहण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:47+5:302021-09-02T05:23:47+5:30
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन २००६ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर ...

गावोगावी उपमार्गाला समस्यांचे ग्रहण!
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन २००६ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर काही दिवसातच सेवा रस्त्यावर वाहनचालकांना विशेषत: दुचाकी चालकांना येणाऱ्या अडचणी, सेवा रस्ते करताना झालेल्या चुका समोर आल्या होत्या. दरवर्षी पावसाळ्यात तीन ते चार महिने सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहात असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. आटके, नांदलापूर, मलकापूर, गोटे, खोडशी, वहागाव परिसरात सेवा रस्त्यावर पाणी साचून राहते. यावर्षी १६ जूनला चक्क पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे आणि खोडशी गावच्या हद्दीत पाच ते सहा फुटाहून अधिक पाणी साचले होते.
सेवा रस्त्यावरील वाहतूक आजवर ठप्प होत होती आणि यंदा सेवा रस्ताच काय तर महामार्गही पाण्यात होता. पहाटेच्यावेळी अंदाज न आल्याने इचलकरंजी येथील एका युवकाची कार या पाण्यात वाहून गेली. यापूर्वीही सेवा रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळेच महामार्ग प्राधिकरणाने सेवा रस्त्यांवरील सोयी-सुविधांबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- चौकट
जिथे ओढे आहेत तिथेच रस्ता केला खोल
ओढ्याचे पाणी सेवा रस्त्यावर साचू नये, यासाठी सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत. मोऱ्यांच्या दोन्ही बाजूला रस्ता खोल करण्यात आल्याने आणि सेवा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याने रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे ओढे असणाऱ्या ठिकाणी रस्ते का उंच करण्यात आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.