ग्रहण चंद्राला... सावट मेंदूला !

By Admin | Updated: April 8, 2015 00:28 IST2015-04-07T23:31:46+5:302015-04-08T00:28:34+5:30

गैरसमजातून भीती कायम : तरीही याच काळात जिल्ह््यामध्ये ३० पेक्षाही जास्त सुदृढ अपत्ये जन्माला--लोकमत सर्वेक्षण

Eclipse lunar eclipse brain! | ग्रहण चंद्राला... सावट मेंदूला !

ग्रहण चंद्राला... सावट मेंदूला !

प्रगती जाधव-पाटील - सातारा : चंद्रग्रहणाची सबब देऊन पाटण तालुक्यातील कोकिसरे येथे प्रसूतीच्या असह्य वेदनेने तडफडणाऱ्या महिलेला दाखल करून न घेण्याची तक्रार दिली गेली आहे. त्याचवेळी सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी ७ मुले आणि २३ मुलींनी जन्म घेतला. विशेष म्हणजे ही सर्व बाळे प्रकृतीने ठणठणीत आणि सुदृढ आहेत. त्यामुळे ग्रहण चंद्र सुर्याला नव्हे तर मेंदूला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गत सप्ताहात शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोकिसरे (कुंभारवाडी) येथील महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला नजीकच्या आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, ‘आज चंद्रग्रहण आहे, त्यामुळे मी प्रसूती करणार नाही,’ असे सांगितले त्यामुळे अवघडलेल्या महिलेसह नातेवाइकही संकटात सापडले. अशा अवस्थेत संबंधित महिलेला घेवून या नातेवाईकांना अनेक ठिकाणी फिरावे लागले.
चंद्र आणि सूर्य यांच्या प्रवासातील एक टप्पा म्हणजे ग्रहण. यात काही शकून आणि अपशकून असण्याचे कारणच नाही. पण शास्त्र आणि परंपरा अशा नावांखाली अनेकजण चुकीच्या पध्दतीने या ग्रहणाचा बागुलबुवा करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ग्रहण न पाळणाऱ्यांकडे तिथे तुच्छतेने पाहिले जाते. जन्मत: एखाद्या बाळाला शारीरिक व्यंग असेल तर त्याला ग्रहाणाचे लेबल लावून त्याचे तुफान मार्केटिंग केले जाते. वास्तवितक आई वडिलांच्या जनुकीयांचाच परिणाम या बाळांच्या शरीररचनेत होतो. ग्रहण न पाळताही टणटणीत बाळे जन्माला येतात. पटत नसले तरीही तान्हुल्याच्या काळजीपोटी अनेक गर्भवती ग्रहण पाळत असल्याचे दिसते.

ग्रहण पाळायचं म्हणजे काय?
सूर्य किंवा चंद्र यापैकी कोणतेही ग्रहण असले तरी गर्भवती महिलांना त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. ग्रहणाचे वेध लागण्यापूर्वी गर्भवतीला जे हवे ते खायला दिले जाते. एकदा ग्रहण सुरू झाले की त्यानंतर तिच्या हालचालींवर घरातील ज्येष्ठांची करडी नजर असते. ग्रहण काळात तिने डोळे मिटून फक्त परमेश्वराची आराधना करावी, अशा सूचना तिला दिल्या जातात. रात्री उशिरा ग्रहण असले तरीही गर्भवती महिलांना जागरण करून ग्रहण पाळावे लागते. जुन्या मंडळींकडून अशी सक्ती केली जात असली तरीही आधुनिक विज्ञानाला हे मान्य नाही.
ग्रहण सुटल्यानंतर काय?
ग्रहण सुटल्यानंतर गर्भवती महिलेने आंघोळ करणे अपेक्षित असते. त्यानंतर घरातील सगळे पाणी ओतून दिले जाते. ग्रहणाच्या दरम्यान घरात जर काही अन्न पदार्थ शिल्लक असेल तर तेही टाकून देण्यात येते. ग्रहाणात सापडलेली कोणतीही वस्तू ग्रहण करणं धोकादायक असल्याचे जुन्या पिढीचे मानणे आहे. विज्ञानाच्या कसोटीवर हे सिध्द झालेले नाही.


आकाशमंडलात चंद्र आणि सूर्य यांच्या प्रवासात ते परस्परांच्या समोर आले तर ग्रहण असते. या दरम्यान पृथ्वीवरील वातावरणात काही प्रमाणात फरक पडतो. सूर्यग्रहण असेल तर भर दुपारी संध्याकाळ झाल्यासारखे वातावरण होते आणि त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. या दरम्यान पृथ्वीवर दूषित हवा पसरते. या हवेचा त्रास होण्याचा संभव असतो. हा त्रास गर्भवती महिला, तान्ही बाळे आणि ज्येष्ठांना होऊ शकतो. पण त्याचा अर्थ काही खाऊ पिऊ नये असा होत नाही.


नैसर्गिक बाळंतपण कसे रोखणार?
गर्भवती महिलेला ग्रहण काळातच नैसर्गिकपणे प्रसव वेदना सुरू झाल्या तर तीने ग्रहण सुटेपर्यंत थांबायचे का? असे थांबणे गर्भवतीला कसे शक्य आहे? ज्या लोकांनी ग्रहण पाळण्याचा नियम घातलया त्यांना तरी ग्रहण सुरू असताना जन्माला येणाऱ्या बाळाला थांबवण्याचे शास्त्र ठाऊक आहे? असे अनेक प्रश्न पडतात.


ग्रहण हे पृथ्वीवरील संकट मानले जाते. अशावेळी आपल्या उदरात बाळ वाढविणाऱ्या आईविषयी अवघ्या घराला काळजी असते. बाळाला काही होऊ नये या प्रेमळ भावनेपोटी तिला शांत बसायला सांगणे इष्ट आहे. पण त्या पुढे हालचालीवर निगराणी ठेवणं आणि तिला जखडल्यासारखं ठेवणं म्हणजे शुध्द थोतांड आहे.
- कमलाबाई भोसले, सातारा
ग्रहण काळात जन्माला आलेले बाळही इतर बाळांप्रमाणेच सुदृढ आणि निरोगी असते. ग्रहणात जन्मलेले बाळ व्यंग घेऊन जन्मते हा लोकांचा गैरसमज आहे. वास्तविक बाळाचा जन्म आणि ग्रहण याचा काहीही संबंध येत नाही.
- डॉ. वृंदा खरात, सातारा

Web Title: Eclipse lunar eclipse brain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.