भरपूर खा.. मनसोक्त खेळा.. एन्जॉय करा!
By Admin | Updated: April 2, 2016 00:04 IST2016-04-01T22:58:45+5:302016-04-02T00:04:54+5:30
दहावीनंतरची सुटी : हे करायचं राहूनच गेलं असं वाटायला नको

भरपूर खा.. मनसोक्त खेळा.. एन्जॉय करा!
प्रगती जाधव-पाटील -- सातारा --दहावीचं वर्ष म्हणून एप्रिलपासूनच मुलं अभ्यासाला लागलेली असतात. ते आता परीक्षेनंतर रिकामी झाली आहेत. सुटीत अवांतरचं दडपण घेण्यापेक्षा भरपूर खा.. मनसोक्त खेळा अन् एन्जॉय करण्यास हरकत नाही.
मुलांच्या करिअरच्या दृष्टीने पालक जरा जास्तच जागरूक असल्याचे पाहण्यास मिळते. त्यामुळे दहावीची परीक्षा झाली की, कोठे पेन्टिंग, इंग्लिश स्पीकिंगपासून ते अनेक क्लासेसची भूत मानगुटीवर बसवले जात आहे. हे प्रमाण काही वर्षांपूर्वी शहरात होते; पण त्याचे लोण आता ग्रामीण भागातही पसरत आहे.वास्तविक पाहता बारावीचं वर्ष ज्याप्रमाणे टर्निंग पॉइंट असते. त्याचप्रमाणे काही अनुभवासाठी महत्त्वपूर्ण असते. अकरावीची परीक्षा झाल्याबरोबर बारावीचा अभ्यास सुरू होतो. त्यानंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, त्यानंतर महाविद्यालयाचे टेन्शन, नोकरीचा शोध हे चक्र सुरू होते. त्यानंतर आपण खरे जगणचे विसरून जातो, असा अनेकांचा अनुभव आहे.
पालकांची नस्ती गडबड
१अनेक पालकांना विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा असे वाटते. विशेष म्हणजे कोणता तरी क्लास लावला तरच वेळेचा सदुपयोग होतो असे त्यांचे म्हणणे असते. म्हणून वाटेल तो क्लास लावून विद्यार्थ्यांना रूटीन घालून देण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे, असे तज्ज्ञ सांगतात. त्यांच्या मते विद्यार्थ्यांपेक्षा पालकच जास्त उतावीळ झालेले असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील आवडी-निवडी समजण्यासाठी काही वेळ दिला पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गॅझेट जास्तीत-जास्त दोन तास
२आपल्या पाल्याने दहावीची परीक्षा दिली म्हणजे तो आता मोठा झाला हा भ्रम पालकांनी दूर करावा. मोबाईल आणि संगणक या गॅझेटमुळे मुलांमध्ये आक्रमकता वाढत असल्याचे जगभरातील अभ्यासक सांगतात. त्यामुळे दिवसभरात विरंगुळा म्हणून या वयातील मुलांना दोन तासापेक्षा गॅझेट देऊ नये. त्यांना त्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यावा, असेही
तज्ज्ञ सुचवतात.
स्पर्धेत आरोग्याकडे दुर्लक्षच
३स्पर्धेत टीकायचे असेल तर पळावे लागेल हे वाक्य सर्वच घरांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी किमान एकदा तरी ऐकलेले असतेच! ही वास्तविकता असली तरी आपल्याकडे अजूनही शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. सुट्टीच्या दिवसांत खूप कमी पालकांनी मुलांच्या आहार आणि विहाराकडे लक्ष दिले आहे. बहुतांश पालकांनी फक्त स्पर्धा आणि पुढील प्रवेश यांचा बाऊ करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे स्पेशल दुर्लक्ष केले आहे.
पौगंडावस्थेत विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर राहायला फार आवडते. वरकरणी आपलं मूल किती शांत आणि एकलकोंडे वाटत असले तरीही त्याच्या मनात मैत्रिचीही नैसर्गिक भावना निर्माण होतेच. म्हणून सुट्टीच्या काळात पालकांनी पडद्यामागच्या प्रॉमटरच्या भूमिकेत राहावे. मुलांची दिनचर्या सक्तीने ठरवू नये. संवादाच्या माध्यमातून मुलांच्या आवडींचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा.
- डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ
दहावी झाली रे झाली की पालकांनी फोन करून माझ्या मुलाची कल मापन चाचणी घ्या, अशी सुरुवात केली. एक वर्ष पूर्ण अभ्यासाच्या दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना इतक्यात कोणत्याही क्लास किंवा अन्य गोष्टींमध्ये जुंपू नये. पालकांना बऱ्याचदा त्यांची मूलं अभ्यासाच्या बाबतीत निष्काळजी वाटतात; पण विद्यार्थ्यांनाही पुढे जाण्याची आस असते हे पालकांनी विसरू नये. मिळालेल्या सुटीत विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
- दीपक ताटपुजे, शिक्षणतज्ज्ञ
दहावी म्हणून गेल्या वर्षभरात मुलीवर अभ्यासाचे दडपण होते. परीक्षा संपल्यानंतर लगेचच तिच्या शाळेचा ग्रुप चार दिवसांच्या सहलीवरही गेलाय. सुट्टीच्या कालावधीत तिचा छंद जोपासता येईल, असा एखादा वर्ग सुरू करण्याची तिची इच्छा असेल तरच आम्ही तिला तिकडे पाठवू. अन्यथा तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊ. दहावीच्या निकालानंतरच आम्ही पुढील प्रवेश आणि अन्य बाबींचा विचार करण्याचे ठरविले आहे.
-विठ्ठल बोबडे, पालक
दहावीत असल्यामुळे गेले वर्षभर बाहेर फिरणे, नातेवाइकांकडे जाणे जवळपास बंद होते. माझ्यामुळे आईचेही घराबाहेर पडणे काहीप्रमाणात बंदच होते. आता परीक्षा संपल्यानंतर तिच्यासह मलाही मोकळीक मिळाली आहे. पुढील एक महिना फिरणे आणि निवांत वेळ घालविण्याचे नियोजन आहे. मे महिन्यात जीम लावण्याचा विचार आहे. वर्षभर इतका अभ्यास केलाय की सुटीत कोणत्याही प्रकारचा अभ्यास नकोच वाटतोय.
- प्रसाद भोसले, विद्यार्थी