चायनीज खा; पण जपून;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:44+5:302021-09-23T04:44:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : हल्ली चटकमटक पदार्थ खाण्याचे फॅड चांगलेच वाढले आहे. मग वडापाव असो किंवा बर्गर, पिझ्झा. ...

Eat Chinese; But be careful; | चायनीज खा; पण जपून;

चायनीज खा; पण जपून;

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : हल्ली चटकमटक पदार्थ खाण्याचे फॅड चांगलेच वाढले आहे. मग वडापाव असो किंवा बर्गर, पिझ्झा. या पदार्थांच्या रांगेत चायनीज देखील सर्वांत पुढे आहे; पण चायनीज पदार्थांमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो हा आपल्या आरोग्याला किती अपायकारक आहे, हे आपण कधीच जाणून घेत नाही. याच्या अधिक सेवनाने गंभीर आजार बळावू शकतात. त्यामुळे ‘चायनीज खा; पण जपून’ असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

गेल्या काही वर्षांपासून सातारा शहरासह जिल्ह्यात चायनीज पदार्थांच्या गाड्यांची संख्या वाढत चालली आहे. शहरातील नव्हे तर ग्रामीण भागातील तरुणाईला देखील चायनीज पदार्थांनी अक्षरश: वेड लावले आहे. सायंकाळ झाली की चायनीज पदार्थांच्या गाड्या गर्दीने गजबजून जातात. आपण मोठ्या चवीने मंच्युरिअन, नुडल्स, सूप असे पदार्थ खातो; पण या पदार्थांना चवदार बनविण्यासाठी वापरला जाणारा अजिनोमोटो किती घातक आहे, याची आपल्याला तसूभरही कल्पना नसते.

ग्राहक वाढविण्याच्या नादात अनेक हातगाडीधारक चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटोचा (टेस्टिंग पावडरचा) प्रचंड मारा करतात. अशा अजिनोमोटोयुक्त पदार्थांमुळे लठ्ठपणा वाढतो. ब्लडप्रेशर, मधुमेह व पोटाच्या अनेक आजारांना आमंत्रण मिळते. अजिनोमोटोचा प्रमाणापेक्षा अधिक वापर अथवा त्याचे सेवन आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे चायनीज पदार्थ खाताना काळजी घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

(चौकट)

काय आहे अजिनोमोटो माहितेय?

अजिनोमोटो पदार्थाची चव वाढविणारा एक पदार्थ आहे. तो पांढऱ्या रंगाचा व तांदळासारखा चमकदार असतो. याला मोनोसोडिअम ग्लुटामेट असेही म्हटले जाते. अन्नपदार्थात हॉटेल व चायनीजच्या गाड्यांवर याचा वापर सर्रास केला जात आहे. याचे अतिसेवनाने घातक आजार बळावू शकतात.

(चौकट)

म्हणून चायनीज खाणे टाळे

विविध प्रकारचे चायनीज पदार्थ, मंच्युरिअन तसेच अलीकडे खाद्यपदार्थ स्वादिष्ट बनविण्यासाठी अजिनोमोटोचा वापर वाढला आहे. चायनीज पदार्थांमध्ये हा घटक सर्रास वापरला जातो. असे पदार्थ सातत्याने खाने आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. अजिनोमोटोमुळे डोके दुखणे, घाम येणे, चक्कर येणे, चेहऱ्यावर सूज येणे तसेच पोटाचे आजार हळूहळू उद्भवू शकतात. त्यामुळे अजिनोमोटोमिश्रित चायनीज पदार्थांचा मोह टाळणे केव्हाही चांगले, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(कोट)

कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन हे शरीराला अपायकारकच आहे. चायनीच पदार्थही यामध्ये मागे नाहीत. केवळ चव वाढविण्यासाठी त्यात अजिनोमोटोचा वापर केला जातो. हा घटक शरीराला अपायकारक आहे. याच्या सेवनाने पोटाचे गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे असे पदार्थ खाण्याचा मोह आवरणे आरोग्यासाठी चांगले आहे.

- डॉ. योगिता शहा, सातारा

Web Title: Eat Chinese; But be careful;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.