शहरात वाढतेय ई-कचऱ्याची समस्या !
By Admin | Updated: October 1, 2015 00:33 IST2015-09-30T22:16:52+5:302015-10-01T00:33:41+5:30
वाढले प्रमाण : पालिकेकडून दुर्लक्ष; कचरा एकत्रिक रणासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही

शहरात वाढतेय ई-कचऱ्याची समस्या !
कऱ्हाड : सध्या सर्वत्रच पर्यावरणाची अवहेलना झाल्याचे दिसते. त्यास कऱ्हाड शहरही अपवाद नाही. मात्र, याबाबीकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शहरात प्लास्टिक तसेच अन्नपदार्थांच्या कचऱ्याबरोबर आता ई -कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दिवसेंदिवस वाढणारा कचरा हा नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असून, या कचऱ्याला नाहीशी करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला आहे. त्यामध्ये टीव्ही, फ्रीज, पंखे, वॉशिंग मशीन अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू अधिक आकर्षक पद्धतीने तयार करून बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जाऊ लागला. वस्तूंच्या दुरुस्तीसाठी जास्त पैसे लागणार असल्याने त्या दुरुस्तीअभावी घरातील तसेच इलेक्ट्रॉनिक दुकानातील एखाद्या खोलीत तशाच टाकल्या गेल्या जाऊ लागल्या. सध्या या वस्तूंचा साठा हा प्रमाणापेक्षा जास्त झाला आहे. शहरातील घरगुती व दुकानामधून एकत्रित केल्या जाणाऱ्या कचऱ्यामध्ये अशा जुन्या वस्तूंचे पार्ट हे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत.
शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये दुरुस्तीसाठी आलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने ते साहित्य दुकानदारांकडून तसेच दिवसेंदिवस साठवून ठेवले जाते. वापराविना पडून राहिलेल्या या साहित्याला कालांतरानंतर गंज चढतो. मग कधीकाळी या वस्तू विद्युत लहरींच्या संपर्कात आल्यास त्यातून शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचेही प्रकार घडतात आणि काहीवेळा असे प्रकार घडलेही आहेत. पावसाळ्यामध्ये शॉर्टसक्रिट होऊन आग लागण्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत.
शहरात मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक साहित्याची दुरुस्ती तसेच विक्री करणारी दुकाने असल्याने त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्यांची विक्री तसेच दुरुस्ती केली जाते. त्या दुकानातील जुन्या वापराविना पडून असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या भंगारातही घातल्या जातात. त्यामुळे शहरात भंगार व्यावसायिकांकडेही इलेक्ट्रॉनिक साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून येते.
शहरात परिसरातून गोळा केलेले भंगाराचे साहित्य गोदाममध्ये साठविले जाते. त्यामध्ये विद्युतवाहक तारा, फ्रिज, टीव्ही, लाईटचे पार्ट तसेच विजेची उपकरणे अशा प्रकारचे जुने साहित्य भंगार व्यावसायिक एकत्रित करून या ठिकाणी आणतात.
मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रानिक कचरा साठला की, पुणे-मुंबई या ठिकाणी पाठविले जाते. इलेक्ट्रॉनिक कचरा साठवताना त्यांची विशेष खबरदारी न घेतल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते.
पालिकेच्या वतीने शहरातील प्लास्टिक कचऱ्याबरोबर अशा इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, बाराडबरी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठवून त्याची तात्पुरती विल्हेवाट लावण्याचे पालिकेकडून केले जात आहे.
या ऐवजी ई- हार्वेस्टिंग प्रकल्प उभारल्यास शहरातून एकत्रित केला जाणारा कचरा व इलेक्ट्रॉनिक कचरा यांची योग्यप्रकारे विल्हेवाट करता येऊ शकेल, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकार सांगतात.(प्रतिनिधी)
ई-कचरा हार्वेस्टिंग प्रकल्प उभारावा
पालिकेकडे स्वत:चा असा ई-कचरा हार्वेस्टिंग प्रकल्पही नाही. शहरातून एकत्रित केला जाणारा ४० टन कचरा हा शहराबाहेरील बाराडबरी या ठिकाणी टाकला जातो. या ठिकाणी एका बाजूला कचरा टाकला जातोय तर दुसऱ्या बाजूला चोवीस तास पाणी योजनेच्या टाकीचे बांधकाम केले जात आहे. या ठिकाणी ई-कचरा हार्वेिस्टंग प्रकल्प उभारावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ई-कचरा म्हणजे...
संगणक, टीव्ही, एलईडी, एलसीडी, टेलिफोन, प्रिंटर, रेडिओ, फॅक्स मशीन, व्हीसीआर, डीव्हीडी, सीडी प्लेअर, मायक्रोवेव्ह, मोबाईल, बॅटरी यापासून निर्माण झालेला कचरा हा ई-कचऱ्यात मोडतो.