तमाशा कलेची ‘पंढरी’ राहुट्यांनी सजली
By Admin | Updated: April 7, 2015 01:13 IST2015-04-07T00:11:59+5:302015-04-07T01:13:09+5:30
काळज : नामवंत मंडळांचा दर लाखांपर्यंत

तमाशा कलेची ‘पंढरी’ राहुट्यांनी सजली
सचिन गायकवाड- तरडगाव -‘तमाशा’ कलेची पंढरी म्हणून काही वर्षांपूर्वी नावारूपास आलेल्या फलटण तालुक्यातील काळज येथे तमाशा मंडळाच्या राहुट्या पडल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्याने फड मालकांना दिलासा मिळाला आहे. गावोगावच्या यात्राकमिटीचे पदाधिकारी तमाशाचा कार्यक्रम ठरविण्यासाठी व सुपारी दराचा अंदाज घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. नामवंत मंडळीचा दर लाखांपर्यंत जात आहे.
सध्या सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू आहे. ग्रामदैवतांच्या यात्रेत तमाशाचे स्थान महत्त्वाचे आहे. तमाशा कार्यक्रमांमुळे नागरिकांचे व पै-पाहुण्यांचे मनोरंजन तर होतेच शिवाय वगनाट्यापासून प्रबोधनाचा प्रयत्न कलावंत करीत असतात. यात्राकाळात गावोगावच्या पदाधिकाऱ्यांची भटकंती होऊ नये, यासाठी अनेक वर्षांपूर्वी काळज येथे तमाशाचे केंद्र उभारले असून, त्यामुळे ग्रामस्थांची चांगली सोय झाली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या दिमाखात ही मंडळी दाखल झाली आहेत. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीची धामधूम, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे सुरुवातीच्या काळात तमाशा केंद्राकडे यात्रा कमिट्यांनी पाठ फिरविली. तसेच आचारसंहितेमुळे रात्रीचे खेळ रद्द झाल्यामुळे कसाबसा पोटापुरता व्यवसाय झाला होता.
यावर्षी देखील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे सावट या मंडळावर होते; परंतु निवडणुकापुढे ढकलल्याने त्यांना दिलासा मिळाला. मात्र, असे असले तरी मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे यात्रा कमिटीचे पदाधिकारी कार्यक्रम ठरविण्यासाठी आल्यावर सुरुवातीला कमी बिदागीत कार्यक्रम करा, असे म्हणताना दिसतात. त्यानंतर दराबाबत थोडी पुढे-मागे चर्चा होऊन दोन्ही बाजूंना परवडेल, अशा किमतीत कार्यक्रम ठरविला जात आहे.
मोठ्या नामवंत तमाशा मंडळांच्या सुपारीचा दर ८० ते ९० हजार रुपये आहे तर छोट्या मंडळांचा दर ५० ते ६० हजार इतका आहे. सुपारीचा अंदाज घेण्यासाठी व कार्यक्रम ठरविण्यासाठी गावोगावच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी वाढली असून, अक्षयतृतीयापर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा असतात. त्यामुळे तमाशा मंडळांना तोपर्यंत चांगली मागणी असते, त्यानंतर पुढे काही दिवसच केवळ मोठी नामवंत तमाशा मंडळे तमाशा केंद्रात दिसतात.
यावर्षी मंगला बनसोडे, प्रकाश अहिरेकर सोबत नीलेशकुमार अहिरेकर, छाया वीरकर तमाशा मंडळ, ज्योती-स्वाती, आशाताई तरडगावकरसह उषाताई सांगवीकर, मनीषा बडकर, मीनाक्षी-काजल तमाशा मंडळ, चंद्रकांत भिसे-पाटील निंभोरकर, भाडळेकर तमाशा मंडळ, चंद्रकांत विरळीकर, हणमंतराव देवकाते-पाटील, सुनीताराणी बारामतीकर, बापूराव पिंपळीकर, सुलोचना पडळकर, बुवासाहेब पिंपरीकर, संजय हिवरे, कैलास पिंपरीकरसह सीमाताई कोल्हापूरकर आदी तमाशा मंडळे दाखल झाली आहेत. तसेच मधुर बिहस, धूमधडाका, स्वरांजली, झकास, मराठमोळा नादखुळा, धुमशान, कौलमराठी मनाचा आदी गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आॅर्केस्ट्रा कार्यक्रम दाखल झाले आहेत.
एका तमाशा मंडळात जवळपास पन्नास कलावंताचा लवाजमा असतो. वाढती महागाई व अधून-मधून होणारी नैसर्गिक आपत्ती यामुळे आर्थिक नियोजन कोलमडते, अशात कलावंताचे मानधन व इतर आवश्यक गरजा पुरविणे जिकिरीचे बनते. याचा विचार लक्षात घेऊन यात्रा कमिट्यांनी सुपारी दराबाबत सहकार्य करावे तसेच काही तमाशा मंडळाचे रखडलेले अनुदान शासनाने वेळीच देणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा सूर्यकांत-चंद्रकांत विरळीकर तमाशा मंडळाचे मॅनेजर बाळासाहेब विरळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.