डफळापूरला लोकवर्गणीतून देवालयाची दुरूस्ती
By Admin | Updated: December 26, 2014 00:20 IST2014-12-25T21:57:01+5:302014-12-26T00:20:29+5:30
हेमाडपंथी बांधकाम : मंदिराकडे दुर्लक्ष; झाडाझुडपांचे साम्राज्य, गाभाऱ्याची दुरवस्था

डफळापूरला लोकवर्गणीतून देवालयाची दुरूस्ती
डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील दुर्लक्षित असलेले, संस्थानकालीन हेमाडपंथी बांधकाम असलेले श्री परमानंद देवाचे मंदिर अखेरच्या घटका मोजत असताना, या मंदिराची दुरूस्ती करण्यासाठी येथील कोरे बंधू पुढे सरसावले आहेत. लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णाेध्दार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
डफळापूर येथील कोळी समाजाचे आराध्यदैवत म्हणून मानले जाणारे श्री परमानंद देवाचे मंदिर दुर्लक्षित आहे. त्याची दुर्दशा झाली आहे. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शंकराची पिंड भग्नावस्थेत आहे. बांधकाम जमीनदोस्त झाले आहे. पिंडीसमोरील असलेले कमानीचे कोरीव बांधकाम आजही बघण्यासारखे आहे. या मंदिराचा काही भाग कोसळलेला आहे. पूजाअर्चा होत नसल्यामुळे स्वच्छतेचा अभाव असल्याने मंदिरात झाडेझुडपे उगवलेली होती.
डफळापूर येथील अशोक कोरे व श्रीकांत कोरे यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णाेध्दार करण्याचा संकल्प केला. त्यानुसार या मंदिरातील झाडेझुडपे काढण्यात आली. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. (वार्ताहर)