तुमच्या लाडक्या चेतकमुळेच आम्ही तळ्याबाबत पत्र दिले: उदयनराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:16 IST2018-09-18T00:16:30+5:302018-09-18T00:16:34+5:30

तुमच्या लाडक्या चेतकमुळेच आम्ही तळ्याबाबत पत्र दिले: उदयनराजे भोसले
सातारा : सन २०१५ रोजी टंचाईची परिस्थिती होती, कित्येक वर्षे तळ्याची स्वच्छता करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुर्गंधी पसरून आजूबाजूच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यातच तळ्यावरच्या तुमच्या लाडक्या चेतकने जलमंदिरच्या चौथऱ्यावर येऊन पत्राची मागणी केल्याने आम्ही ते पत्र दिले आहे. आमच्या पत्रामुळे तळ्यातील विसर्जनास बंदी घातली नसून, उच्च न्यायालयात तुमच्या दोन चमको नगरसेवकांनी सभेच्या मंजुरीशिवाय तत्कालीन मुख्याधिकाºयांना प्रतिज्ञापत्र द्यायला भाग पाडल्यानेच बंदी घातली आहे. याचे आत्मचिंतन करून आमदारांनी आपल्या मर्यादा लक्षात घेऊन बेताल आरोप करावेत, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘आमचे पत्र दिल्याने जर विसर्जन तळ्यावर बंदी घातली असेल तर आम्ही दिलेल्या ना हरकतीच्या पत्राने ती बंदी उठली पाहिजे; पण तसे जिल्हा प्रशासन करीत नाही, याचाच अर्थ आम्ही पत्र दिल्याने बंदी घातली गेली नाही तर ती बंदी उच्च न्यायालयातील तत्कालीन मुख्याधिकाºयांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे घातली गेली आहे, हे आमदारांना समजलेले नाही. आम्ही मंगळवार तळ्यावर विसर्जनास परवानगी देण्याबाबतचे दि. ७ रोजी पत्र दिले आहे, त्या पत्रात २०१५ मध्ये दिलेल्या पत्राचा उल्लेख केलेला आहे. डीजेबाबत बंदी नसावी, असे आम्ही परखडपणे मांडले तर शेवटचे दोन दिवस डीजेला परवानगी द्यावी, असे नुकतेच आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी म्हणणे मांडले आहे. शिवेंद्रसिंहराजे बोलले म्हणजे ती मागणी झाली आणि आम्ही सामान्यांचे मत मांडले की तो स्टंट झाला. आम्ही स्टंटबाज तर तुम्ही स्पॉटबॉय का? असा घणाघातही खा. उदयनराजे यांनी केला.
गणेशभक्तांची आम्ही माफी मागून मंगळवार तळे विसर्जनास खुले होणार असेल तर आम्ही केव्हाही माफी मागण्यास तयार आहोत. तथापि तुमच्या बँका आणि संस्थांमधील प्रचंड भ्रष्टाचारामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले त्याबद्दल तुम्ही गांधी मैदानावर तुमचे नाक घासणार
का? आम्ही घेतलेल्या कणखर भूमिकेमुळेच प्रशासनाने, जिल्हा परिषदेच्या शेती शाळेतील
जागेत कृत्रिम तळे काढण्यास सुरुवात केली आहे. नाही तर गणेशभक्तांना कण्हेर तलावाच्या खाणीत विसर्जनासाठी जावे लागले
असते. जिल्हा परिषदेला शेती शाळेतील जागा न देण्याविषयी कुणाचा दबाव होता, हे आता लपून राहिलेले नाही.
दाढ्या वाढवून
अकलेत वाढ होत नसते...
आम्ही आजपर्यंत आत एक आणि बाहेर एक, अशी कधीही भूमिका मांडलेली नाही. दिवंगत दादामहाराज यांच्यापासून आम्ही जनतेबरोबर आहोत आणि जनतेमध्येच आम्ही आमच्या कुटुंबाची स्वप्ने पाहत असतो. तुमच्यासारखे सहकाराखाली संस्था काढून कुणाला देशोधडीला तरी आम्ही लावलेले नाही. दाढ्या वाढवून अकलेत वाढ होत नसते. त्यासाठी आडात असावे लागते. स्वत:ची ठाम भूमिका आणि पकड असावी लागते, तुम्ही कुणाची करंगळी धरून तुमचे राजकारण करीत आहात, हे सामान्य जनतेलाही माहिती आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधीची जबाबदारी सांगू नका, तुमच्या पायरीने तुम्ही राहा, असा खरमरीत इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.