वादळी वाऱ्यामुळे आंबा पुन्हा दुरावला!
By Admin | Updated: May 11, 2015 23:26 IST2015-05-11T22:16:39+5:302015-05-11T23:26:03+5:30
किंमत वाढणार : कच्च्या कैऱ्यांचा झाडाखालीच सडा; शेतकऱ्यांचे नुकसान

वादळी वाऱ्यामुळे आंबा पुन्हा दुरावला!
कोपर्डे हवेली : बाजारात सध्या आंबा दाखल झाला आहे. मात्र, या आंब्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. सध्या शिवारामध्ये आंब्यांची झाडे बहरली आहेत. त्यामुळे सामान्यांना त्याची चव चाखता येईल, अशी परिस्थिती असतानाच दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. या वादळात आंबे झडून मोठे नुकसान झाले. आता आंबा सामान्यांपासून आणखी दुरावणार असल्याची चिन्हे आहेत.
कऱ्हाड तालुक्यात सर्वात जास्त आंब्याची आवक पाटण तालुक्यातील गावांमधून होते. मुळात पाटण तालुका कोकण पट्ट्यात असला तरी यावर्षी आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाटण तालुका डोंगरांनी वेढला असून, कोकण पट्ट्यात येणाऱ्या या तालुक्यात आंब्यांसाठी अनुकूल वातावरण आहे. तालुक्यातील अगदी खेडोपाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर आंब्याची झाडे असून, आंबा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना वेगळे कष्ट घेण्याची गरज पडत नाही. अनेक वर्षे जुन्या असणाऱ्या झाडांना आंब्याची फळे लागून त्याची चव आंब्यांच्या मोसमात चाखायला हमखास मिळते. गेल्या काही वर्षांत शेतकरी आंबा फळाकडे केवळ पिकल्यावर विक्री करून पैसे मिळविणे या पारंपरिक पद्धतीला छेद देत लोणच्यासाठी कच्ची कैरी विकून त्याद्वारे आर्थिक नफा मिळवू लागला आहे. त्यामुळे पाटणच्या शेती उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या काही वर्षांपासून कच्च्या कैरीचे सौदे सुरू आहेत. आंब्याचे उत्पन्न चांगले मिळण्यासाठी व झाडाला मोहोर येऊन त्याची फळे बनण्यापासून ते ती चांगल्या अवस्थेत टिकून राहण्यासाठी वातावरणाचा मोठा वाटा असतो. ढगाळ वातावरण व पावसाने आंब्याला मोठा फटका बसतो.
ढगाळ वातावरणामुळे मोहोर गळून गेल्यास झाडाला फळे लागत नाहीत. यावर्षी तर वातावरणातील बदल आंबा पिकासाठी खूपच प्रतिकूल ठरला असून, अपवाद वगळता हिवाळ्याच्या प्रत्येक महिन्यात वळवाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडाला फळांचे प्रमाण फारच कमी होते. त्यातूनही जी
फळे वाचली होती, ती दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने गळून पडली आहेत.
परिणामी, पाटण तालुक्यातून होणारी आंब्याची आवक घटणार आहे. हीच परिस्थिती कऱ्हाड तालुक्यातही आहे. दोन दिवसांपूर्वीच्या वादळाने ठिकठिकाणी आंब्याचा सडा पडला. परिणामी, आंबा दुर्मिळ होणार असल्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे हानीकारक
झाडाला फळेच राहिली नसल्याने आंबा पिकून त्याची चव चाखण्याची संधी मिळणे आता दुरापास्त झाले आहे. त्यामुळे यावर्षी सर्वसामान्यांना आंबा विकत घेऊन खाणे खिशाला न परवडणारे ठरणार आहे. बाजारात कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे दाखल होतात. काही नागरिक असे आंबे खरेदी करून चव भागवतात. मात्र, या अशा पद्धतीने पिकविलेले आंबे शरीरास अपायकारक ठरू शकतात.