कागदी घोड्यांमुळे कऱ्हाडात वाहनधारकांची कोंडी

By Admin | Updated: October 9, 2015 23:39 IST2015-10-09T20:58:08+5:302015-10-09T23:39:54+5:30

पोलिसांचे प्रस्ताव पालिकेत धूळखात पडून : ‘पार्किंग झोन’सह एकेरी वाहतुकीची फक्त चर्चाच; बेशिस्तीमुळे त्रास वाढला

Due to paper hawkers, drivers of vehicles in Karhad | कागदी घोड्यांमुळे कऱ्हाडात वाहनधारकांची कोंडी

कागदी घोड्यांमुळे कऱ्हाडात वाहनधारकांची कोंडी

कऱ्हाड : वाहतुकीला शिस्त लावताना पोलीस घामाघूम होतायत़ मात्र, पालिकेला याचे काहीच सोयरसुतक नसल्यासारखी परिस्थिती आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर एकेरी वाहतूक करण्यात यावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तसेच ‘पार्किंग झोन’चा प्रस्तावही पालिकेत धूळखात पडून आहे. मात्र, हे प्रस्ताव लालफितीत अडकल्याने वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची स्थिती आहे. शहरातील शाहू चौकापासून ते दत्त चौक व दत्त चौकापासून तहसील कार्यालय मार्गे शाहू चौकापर्यंतचा रस्ता एकेरी वाहतुकीकरिता आहे़ मात्र, या रस्त्यावरही दुतर्फा पार्किंग केले जाते़ मुख्य बाजारपेठेसह अन्य काही ठिकाणचे रस्ते अरुंद आहेत़ संबंधित रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यासाठी काही वर्षांपूर्वी पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता़ मात्र, या प्रस्तावाला अद्यापही ‘ग्रीन सिग्नल’ मिळालेला नाही़ एकेरीच्या प्रश्नाबरोबरच पार्किंग झोनचा प्रश्नही वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा बनला आहे़ मुख्य बाजारपेठेत दत्त चौकापासून यशवंत हायस्कूलनजीकचा चौक, आझाद चौक, चावडी चौक व चावडी चौकापासून कन्या शाळेपर्यंतच्या मार्गावर सम-विषय तारखेनुसार पार्किंगव्यवस्था करण्यात आली आहे़ मात्र, या मार्गावर पार्किंगचे पांढरे पट्टे नाहीत़ त्यामुळे अस्ताव्यस्त पार्किंग होताना दिसते़ तसेच या मार्गावर अपवाद वगळता कोठेही सम-विषम तारखेच्या पार्किंगचे फलक लावले गेलेले नाहीत़ त्यामुळेही वाहनधारकांच्या गोंधळात भर पडते़ बाजारपेठेतील रस्त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी कोठेही अन् कसेही पार्किंग केले जाते़ दत्त चौकात तर पार्किंग व्यवस्थेचा अक्षरश: खेळखंडोबा झाल्याची परिस्थिती आहे. याठिकाणी अवजड वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केली जात आहेत़ परिणामी, वाहतूक कोंडीत भर पडत आहे़
कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळूक व वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक धनंजय पिंगळे यांनी पालिका, परिवहन अधिकाऱ्यांसोबत शहरातील रस्त्यांची पाहणी करून सुधारित प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात पार्किंग झोन व एकेरी वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्यात आले होते. याबाबत तत्कालीन पोलीस उपअधीक्षक भारत तांगडे यांच्यासह इतर शासकीय अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांची संयुक्त बैठकही झाली होती. त्या बैठकीत या प्रस्तावावर हरकती मागवून सात दिवसांत अंतिम अहवाल सादर करण्याचे व प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्याचे ठरले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. त्या बैठकीनंतर प्रस्ताव बारगळले. अद्यापही त्या प्रस्तावाबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. सध्या पोलीस व पालिकेची वाहतूक प्रश्नासंदर्भात वारंवार बैठक होते. चर्चा होतात; पण कार्यवाही काहीच होत नाही. या परिस्थितीमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)


एकेरी वाहतुकीचे प्रस्तावित मार्ग
१) मुख्य टपाल कार्यालय ते बसस्थानकानजीकचा कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा मार्ग़
२) चावडी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आझाद चौक ते कृष्णा घाट मार्ग़ कृष्णा घाटावरून आझाद चौकाकडे येणाऱ्या वाहनांसाठी सातशहीद चौक मार्ग ते आझाद चौक़
३) प्रीतिसंगमावरून मंगळवार पेठेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सोमवार पेठेतील मार्ग़ ही वाहने सोमवार पेठेतून कन्याशाळेकडे जातील़
४) पोपटभाई पेट्रोलपंपापासून दत्त चौकाकडे येणाऱ्या वाहनांसाठी पोपटभाई पेट्रोलपंप ते अजंठा ते दूरसंचार निगम (बीएसएनएल), दैत्यनिवारणी ते शाहू चौक ते दत्त
चौक मार्ग़ तसेच दत्त चौकापासून शहराबाहेर पडणारी वाहने शहर
पोलीस ठाण्यासमोरून पोपटभाई पेट्रोलपंप व तेथून कोल्हापूर
नाक्याकडे जातील़

प्रस्तावित पार्किंग झोन
१) शहरातील विठ्ठल चौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, जुन्या राजमहाल टॉकीजसमोर, दिवाणी न्यायालयाशेजारील मोकळ्या जागेत, पाटण कॉलनीतील मोकळ्या जागी, यशवंत हायस्कूलच्या पाठीमागे, आराधना स्वीट सेंटरच्या पाठीमागील बाजूस, कृष्णा घाट येथे बालाजी मंदिरासमोर पालिकेने पार्किंग झोन सुरू करावेत़
२) कन्याशाळा ते पांढरीचा मारुती चौक दरम्यानच्या मार्गावर डाव्या बाजूस चारचाकी व उजव्या बाजूस दुचाकीचे पार्किंग झोन करावेत़
३) कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा ते मुख्य पोस्ट आॅफिस मार्ग, परमार लाईट हाऊस ते शालीमार लॉज चौकापर्यंतचा मार्ग, स्वागत स्वीट ते मुख्य टपाल कार्यालय मार्ग, आराधना स्वीट ते बुरुड गल्ली मार्ग, आझाद चौक ते सातशहीद चौक मार्ग, मनोरा ते डुबल गल्ली मार्ग, जोतिबा मंदिर ते आंबेडकर पुतळा ते महात्मा जोतिबा फुले पुतळा ते बापूजी साळुंखे पुतळा या मार्गांवर सम-विषम ताराखांप्रमाणे ‘पार्किंग झोन’ करावेत़

Web Title: Due to paper hawkers, drivers of vehicles in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.