एसटीच्या कमी फेऱ्यामुळे वडाप जोमात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST2021-02-06T05:12:28+5:302021-02-06T05:12:28+5:30
वाई : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव होता. या काळात एसटी सेवा ही पूर्णपणे बंद होती. परंतु अलीकडच्या तीन ...

एसटीच्या कमी फेऱ्यामुळे वडाप जोमात !
वाई : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव होता. या काळात एसटी सेवा ही पूर्णपणे बंद होती. परंतु अलीकडच्या तीन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग कमी होऊन व्हॅक्सिनही आल्याने काही प्रमाणात एसटी सेवा सुरू केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र एसटीच्या कमी फेऱ्यांमुळे ग्रामीण भागात वडाप सुसाट धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास असूनही वडापचा आधार घ्यावा लागत आहे.
शासनाने २३ नोव्हेंबरला नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले आणि २७ जानेवारीला पाचवी ते आठवी वर्ग सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर मुले प्रवास करू लागली; परंतु अजून बहुतांश गावांना पूर्वीप्रमाणे नियमित एसटीच्या फेऱ्या सुरू नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.
वाई आगारात एकूण ६५ बस असून, पैकी ५८ बस सध्या कार्यरत आहेत. काही बस दुसऱ्या आगारांकडे वर्ग केल्या आहेत. वाई तालुक्यातील ग्रामीण भागात यापूर्वी एकूण १८० फेऱ्या होत होत्या. परंतु आता १२० फेऱ्या सुरू असल्यामुळे मुख्य मार्गावर काही फेऱ्या सुरू केल्या असल्या तरी अनेक गावांची अजूनही बससेवा सुरू नाही. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी असल्यामुळे खासगी वडाप मात्र तेजीत चालले आहे, त्याचा फायदा वडापवाल्यांनी पुरेपूर उठविला असून, नागरिकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. चाकरमानी, शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचे एसटी पासेस असताना त्यांना दररोज जादा भाड्याचा फटका सहन करावा लागत आहे. तरी शेवटच्या थांब्याच्या गावांपर्यंत एसटी बसच्या फेऱ्या त्वरित सुरू करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी विद्यार्थी, प्रवासी यांच्याकडून करण्यात येत आहे.
कोट..
सध्या तालुका, जिल्ह्याबाहेरील लांब पल्ल्याच्या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू आहेत. वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य मार्गावरील बससेवा सुरू केली आहे. अजून काही गावांना बससेवा बंद असून, टप्प्याटप्प्याने बंद फेऱ्याही चालू केल्या जातील.
-जी.एम. कोळी, वाई आगार व्यवस्थापक
फोटो....
०४वाई
वाई तालुक्यातील बहुतांश गावांना पूर्वीप्रमाणे नियमित एसटीच्या फेऱ्या सुरू नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.