नियोजनाअभावी अपघातांत वाढ!
By Admin | Updated: June 27, 2015 00:17 IST2015-06-26T23:25:13+5:302015-06-27T00:17:33+5:30
दोन वर्षांचा अनुभव : अरुंद रस्त्यांमुळे फलटण तालुक्यात घडताहेत प्रकार--पंढरीची वाट लई अवघड :५

नियोजनाअभावी अपघातांत वाढ!
नीलेश सोनवलकर -दुधेबावी -श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण तालुक्यात आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक दिंड्या सहभागी होत असतात. तसेच अनेक वारकरी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे अरुंद रस्त्यावर ताण येत आहे. त्यातून अपघातांच्या घटनांना निमंत्रण मिळत आहे. यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिंगणापूर, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री क्षेत्र भिवाई कांबळेश्वर, श्री क्षेत्र धुळोबा धुळदेव येथील पालख्या सहभागी होत असतात. पालख्या, वारकरी रस्त्याने चाललेले असतात. त्याचवेळी अनेक वाहने भरधावपणे जात असतात.
पालखीचा फलटणनंतरचा मुक्काम बरड येथे असल्याने परिसरातील शेकडो भाविक येतात. बरडला दोन दिवसांचा मुक्काम असल्याने पुणे-पंढरपूर मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्या काळात दोन दिवस वाहतूक वळविणे गरजेचे असते. दोन दिवसांच्या कालावधीत पोलिसांना योग्य अंतरावर थांबवून वाहतुकीची व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
पावसामुळे पालखी मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या खचत असतात. अवजड वाहन गेल्याने खड्डे पडल्याने त्या भरून घ्याव्यात, म्हणजे कसरत करावी लागणार नाही. तसेच काटेरी झुडपांमुळे वाहने दिसत नाहीत. त्यामुळे झुडपे काढल्यास नक्कीच अपघात टाळता येतील.
आपत्कालीन यंत्रणा हवीय सावध...
लोणंदजवळ दोन वर्षांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्यावेळी चांगली आरोग्य सेवा पुरविली होती. त्याचप्रमाणे फलटण तालुक्यात भविष्यात कधी अनावधनाने अपघात झालेच तर तातडीने आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करावी.