अपुऱ्या संख्याबळाने होतेय पळापळ
By Admin | Updated: May 11, 2015 23:27 IST2015-05-11T22:07:04+5:302015-05-11T23:27:31+5:30
पोलिसांवर ताण : दिवसेंदिवस वाढतोय गुन्हेगारीचा आकडा

अपुऱ्या संख्याबळाने होतेय पळापळ
औंध : औंध पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ३९ गावे येतात व प्रत्येक गावाला एक पोलीस म्हटले ३९ ची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात २९ स्टाफ असल्याने व भागातील वाढता क्राईम रेट लक्षात घेता औंध पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी वाढविण्याची मागणी होत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांची मात्र पळापळ होताना दिसत आहे. सध्या औंधमध्ये पाच बीट व दूरक्षेत्र पुसेसावळीमध्ये पाच बीट आहेत. तसेच सद्य:स्थितीत सहायक फौजदार २, हेड कॉन्स्टेबल १०, पोलीस नाईक ५, पोलीस शिपाई ६ व महिला पोलीस ६ असा स्टाफ आहे.
औंध आणि परिसरातील वाढती वाहतूक व त्यामुळे वाढलेले अपघाताचे प्रमाण खूप आहे. तसेच विद्युत मोटारी भागातील पवनचक्की केबल, कॅनॉलच्या आसपासच्या केबल तसेच डी. पी. चोरींच्या प्रमाणात वाढ झाली असून, अपुऱ्या संख्याबळामुळे सर्वच गुन्ह्यांचा तपास पूर्ण होतोयच असे काही दिसून येत नाही.
औंध आणि परिसरातील जमिनीचे वादच जास्त होत असल्याने वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाल्यावर दोन्ही पक्ष पोलीस स्टेशनला येत असतात.
सध्या जास्तीत जास्त गुन्हे जमिनीच्या पाईपलाईनच्या वाटपाच्या वादावरूनच दाखल झालेले आहेत. (प्रतिनिधी)
पोलिस कुमक कमीचऔंध हे पर्यटन क्षेत्र आहे. तसेच यंदा ऊस वाहतूकही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या भागातून झाली आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडल्याचे एक दिवसाआड घटना होत आहे. एकूणच वाढता क्राईम रेट, वाहतूक रहदारी भुरट्या चोऱ्यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी आहे. त्या कर्मचाऱ्यांची मोठी पळापळ होताना दिसत आहे. त्यामुळे अजून ३ हेडकॉन्स्टेबल, २ पोलीस नाईक व ५ पोलीस शिपाई वाढविण्यात यावे. जेणेकरून एका गावास एक पोलीस मिळावा, ही अपेक्षा लोकांच्यातून व्यक्त होत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात औंध परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. अनेक ठिकाणाहून नवविवाहित जोडपी औंधच्या यमाई देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांनाही याचा धोका आहे.