कोरोनाच्या घटत्या संख्येमुळे आरोग्य प्रशासनाला स्वस्थता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:09+5:302021-06-16T04:51:09+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत गेला. तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या अकरा हजारांपेक्षा जास्त झाली असली ...

कोरोनाच्या घटत्या संख्येमुळे आरोग्य प्रशासनाला स्वस्थता...
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत गेला. तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या अकरा हजारांपेक्षा जास्त झाली असली तरी तालुक्यात सध्या केवळ ४०० रुग्ण पॉझिटिव्ह असून, ते विविध ठिकाणी अद्यापही उपचार घेत आहेत. प्रशासनाच्या दक्ष कारभारानंतर गेल्या चार दिवसांत रुग्णसंख्या तिशीच्या घरात आल्याने आरोग्य प्रशासनाला थोडी स्वस्थता मिळाली आहे. तालुक्याभोवती आवळलेला फास हळूहळू कमी होऊ लागल्याने चिंता दूर होत असल्याचे दिसून येत आहे.
सरकारच्या लॉकडाऊननंतरही नियमांची पायमल्ली झाल्याने रुग्णांची संख्या तालुक्यात झपाट्याने वाढत गेली. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, यासाठी गावोगावी उपाययोजना केल्या. विशेषतः खंडाळा व लोणंद नगरपंचायत क्षेत्रासह शिरवळमध्ये प्रशासनाने नियम काटेकोर करून कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले.
खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोनाची एकूण संख्या ११,२२० पर्यंत पोहोचली आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्येपैकी शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत २२६, लोणंद केंद्राअंतर्गत १०७ तर अहिरे केंद्रातंर्गत ११८ पॉझिटिव्ह संख्या आहे. तर गेल्या दोन दिवसांत बाधित संख्या तीसच्या घरात आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
- प्रत्येक जिल्हा परिषद गटात दक्षता पथक नेमले आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे, विलगीकरण कक्षातील सुविधांची पाहणी करून पूर्तता करणे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरण यावर देखरेख ठेवणे यासाठी गटविकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली ही पथके कार्यरत आहेत.
-लहान मुलांची काळजी पुढील काळात तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून लहान मुलांची काळजी घेण्यासाठी ग्रामस्तरीय कमिटीमध्ये स्थानिक शिक्षकांचा समावेश करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. मुलांच्या संपर्कात राहून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्रास जाणवणाऱ्या मुलांना उपचार मिळवून देणे याकडे शासनाचा कटाक्ष आहे.
-तालुक्यात खंडाळा ग्रामीण रुग्णालय, शिरवळ, अहिरे, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. तर इतर उपकेंद्रामध्ये आठवड्यातून एकदा लसीकरण केले जाते. मात्र, लसीकरणाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करून प्रत्येक गावी शिबिर घेऊन लसीकरण व्हावे, अशी मागणी लोकांमधून होत आहे.