मृत मासे टाकून जलप्रदूषणाचा निषेध
By Admin | Updated: May 19, 2015 00:23 IST2015-05-18T23:30:55+5:302015-05-19T00:23:08+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय : इस्लामपूरच्या मानवाधिकार संघटनेचे तीव्र आंदोलन

मृत मासे टाकून जलप्रदूषणाचा निषेध
सातारा : भुर्इंज येथील किसन वीर व रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी दूषित पाणी कृष्णा नदीपात्रात सोडल्याने असंख्य मासे मृत्युमुखी पडले आहेत. तरीही दोन्ही कारखान्यांवर नाममात्र कारवाई झाली आहे.
याचा निषेध करीत इस्लामपूर येथील इंटरनॅशनल ह्युमन राईट्स जस्टिस फेडरेशनच्या वतीने सातारा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात मृत मासे टाकून आंदोलन केले.संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष विजय जाधव यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, किसन वीर कारखान्याने सोडलेल्या दूषित पाण्यामुळे लिंब व कृष्णा कारखान्याने सोडलेल्या दूषित पाण्यामुळे सांगली जिल्ह्यातील नरसिंहपूर, बहे, खरातवाडी, फार्णेवाडी, बोरगाव, बनेवाडी, ताकारी, तुपारी भागांतील लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. नदीतील पाण्याचा रंग बदलला असून, पाण्याला दुर्गंधी येत आहे. नदीच्या दोन्ही काठाला मृत माशांचा थर साचला आहे.
नदीकाठच्या गावांतील लोकांना पंधरा दिवसांपासून हेच पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ७, ८, ९ मे रोजी अनुक्रमे सांगली, कऱ्हाड व रेठरे बुद्रुक येथे आंदोलन केले होते. त्यावेळी कारखाना व्यवस्थापनाने दूषित पाण्याशी आमचा संबंध नसल्याचे म्हटले होते.
दरम्यान, शनिवारी (दि. १६) प्रशासनाने कृष्णा व किसन वीर कारखान्याला पाणी दूषित केल्याप्रकरणी दोषी ठरवत कारवाईच्या नोटिसा पाठविल्या आहेत. नदीकाठच्या दोन्ही कारखान्यांकडून पाच लाख रुपये अनामत म्हणून जप्त करावेत, अन्यथा गुरुवारी (दि. २१) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पोतंभर मासे, दुर्गंधी, स्वच्छता अन् रूमफे्रशनर ...
येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात दुपारी अडीचच्या सुमारास दहा ते बाराजण आले होते. त्यांनी पोत्यात मृत मासे भरून आणलेले. आल्या-आल्या त्यांनी कार्यालयात सर्वत्र मासे टाकण्यास सुरुवात केली. ‘कारवाई करत नसणाऱ्या मंडळाचा निषेध असो, धिक्कार असो,’ अशा घोषणाही दिल्या. त्यानंतर सर्वांनी एक-एक मासा प्रत्येक टेबलावर ठेवला. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत सर्वांनी हा प्रकार केला. मासे टाकल्यानंतर सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचाऱ्यांनी त्वरित मासे भरून ठेवले. संबंधित वाहनांना बोलावून घेऊन त्यामध्ये मासे भरले. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पाणी मारून कार्यालयातील खालील सर्व जागा साफ केली. वास जावा म्हणून रूमफ्रेशनरही मारण्यात आला.